मुंबई : प्रसिद्ध गेमिंग स्टार स्काउटची (ScoutOp) गर्लफ्रेंड काशवी हिरानंदानी हिने ‘बिग बॉस २०’ (Bigg Boss 20) च्या एका वादग्रस्त एपिसोडनंतर अखेर जाहीर माफी मागितली आहे. रविवारी २५ ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या ‘वीकेंड का वार’ या विशेष भागात काशवीने हजेरी लावली होती. या शोदरम्यान तिने तिचा बॉयफ्रेंड स्काउट आणि त्याची घरातील ‘मानलेली बहीण’ लव गिल यांच्या वाढत्या जवळीकीवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला होता. लवने स्काउटला मसाज करणे ताबडतोब बंद करावे, कारण यामुळे तिच्या कुटुंबीयांना खूप त्रास होत असल्याचे काशवीने उघडपणे सुनावले होते. तसेच, लव ही खेळात स्काउटचा गैरफायदा घेऊन त्याला हाताळत आहे, असा गंभीर आरोप करत तिने स्काउटला लवपासून दूर राहण्याचा सल्लाही दिला होता.
लव गिलच्या टीमच्या आक्रमक भूमिकेनंतर काशवी बॅकफूटवर

टीव्हीवर जाहीरपणे अशा प्रकारे आरोप केल्यानंतर लव गिलच्या टीमने आक्रमक पवित्रा घेतला. राष्ट्रीय वाहिनीवर आपल्या कलाकाराचे चारित्र्यहनन (Character Assassination) करण्यात आल्याचा गंभीर आरोप लवच्या टीमने केला. या वादानंतर सोशल मीडियावर काशवीला प्रचंड ट्रोल करण्यात आले. या सर्व वादानंतर काशवीने आपण वापरलेल्या शब्दांची निवड चुकीची होती, हे अखेर मान्य केले. मात्र, या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट विशेष चर्चेत राहिली, ती म्हणजे इतका मोठा माफीनामा लिहूनही काशवीने आपल्या संपूर्ण निवेदनात लव गिलचे नाव एकदाही घेतले नाही.
View this post on Instagram
इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे मांडले मनोगत
सोमवारी सकाळी काशवीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर करत या संपूर्ण वादावर आपले स्पष्टीकरण दिले. ती म्हणाली की, तिचा मुख्य उद्देश केवळ स्काउटशी संवाद साधणे, त्याला त्याच्या काही चुकांची जाणीव करून देणे आणि त्याच्या वागण्याबद्दल त्याला जाब विचारणे हाच होता. परंतु, हे सर्व करताना तिचे काही शब्द या प्रकरणात जोडल्या गेलेल्या इतर व्यक्तींसाठी अत्यंत असंवेदनशील ठरले, याची तिला आता जाणीव झाली आहे.
‘दुसऱ्याच्या चारित्र्यावर बोट ठेवण्याचा अधिकार मला नाही’
आपल्या दिलगिरी व्यक्त करताना काशवीने लिहिले, “त्या क्षणी माझ्या मनात ज्या काही तीव्र भावना होत्या, त्याला काहीही महत्त्व असले तरी, दुसऱ्या कोणाच्याही हेतूंवर किंवा चारित्र्यावर जाहीरपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार मला अजिबात नव्हता. मी माझ्या भावना अधिक चांगल्या आणि संयमी शब्दांत मांडू शकले असते.”
‘कोणालाही द्वेष किंवा त्रास देण्याचा माझा हेतू नव्हता’
कोणत्याही महिलेविरुद्ध समाजात द्वेष पसरवणे किंवा चाहत्यांना तिला लक्ष्य करण्यासाठी उद्युक्त करणे हा तिचा कधीही हेतू नव्हता, असा खुलासा काशवीने केला. आपल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत तिने दिलगिरी व्यक्त केली. तिने पुढे लिहिले, “सोशल मीडियावर सतत व्हायरल होणारे ‘ती सर्व नाटक करतेय’, ‘ही तिची मोठी स्ट्रॅटेजी आहे’ यांसारखे व्हिडिओ आणि कमेंट्स पाहून माझ्या भावनांवरचा ताबा सुटला होता आणि मी भरकटले. पण मी अधिक प्रगल्भ आणि समंजसपणा दाखवायला हवा होता. त्या व्यक्तीला काहीही बोलण्याचा किंवा सुनावण्याचा मला कोणताही अधिकार नाही. मी माझी चूक पूर्णपणे मान्य करते आणि माझ्या या वक्तव्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्या सर्वांची मी मनापासून माफी मागते.” अशा प्रकारे, लव गिलमुळे निर्माण झालेल्या या मोठ्या वादानंतर काशवीने आपली चूक मान्य करत दिलगिरी व्यक्त केली खरी, परंतु संपूर्ण माफीनाम्यात लवचे नाव घेणे तिने जाणीवपूर्वक टाळल्यामुळे सध्या सोशल मीडियावर यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.