२४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत बॉलीवूड म्युझिक प्रोजेक्टच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक कलाकारांनी आपली कला सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मात्र शिल्पा रावचा शो सर्वाधिक चर्चेत राहिला. याचे कारण म्हणजे तिचा शो मध्येच थांबवण्यात आला आणि १५ मिनिटे तसाच बंद राहिला. गायिकेचा माईक बंद करण्यात आला आणि लाईट्ससुद्धा बंद करण्यात आले. यादरम्यान, शिल्पा राव केवळ नाराजच नव्हती तर प्रेक्षकही चकित झाले होते. शिल्पाने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून शोमध्ये घडलेल्या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. तिने चाहत्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याचे स्वागतही केले आणि त्यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली.
मिळालेल्या वृत्तानुसार कार्यक्रमाच्या वेळापत्रकात झालेल्या विलंबामुळे शिल्पा रावचा कार्यक्रम अर्धवट थांबवण्यात आला. यावेळी स्टेजवरील दिवे बंद करण्यात आले आणि गायिकेचा माईकही बंद करण्यात आला. चाहते तिला ऐकण्यासाठी उत्सुक होते आणि तिचे नाव घेऊन तिला प्रोत्साहन देत होते. परंतु आयोजकांनी माईक पुन्हा सुरु केला नाही किंवा शिल्पाला तिच्या चाहत्यांचा निरोप घेण्याची संधीही दिली नाही. आता तिने सोशल मीडियावर या कार्यक्रमाबद्दल एक पोस्ट शेअर केली असून त्यात तिने नाराजी व्यक्त केली आहे आणि तिच्या चाहत्यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत शिल्पा रावने लिहिले: “आज मुंबईत माझ्या मनाला वेदना झाल्या. जेव्हा एखादे इतके सुंदर व्यासपीठ अशा प्रकारे हिरावून घेतले जाते, तेव्हा खूप वेदना होतात. तरीही, संगीत थांबले असतानाही तुम्ही थांबला नाहीत. तुम्ही माझे नाव पुकारत राहिलात आणि तुमच्या आवाजातील प्रेम मी स्पष्टपणे अनुभवू शकले. आज रात्री आपली गोष्ट पूर्ण होऊ शकली नाही, पण मी तुम्हाला वचन देते, मी नक्की परत येईन. माझे मुंबईवर खूप प्रेम आहे आणि ते नेहमीच राहील. शिल्पा.”