मुंबईतील जुहू येथील मैदानावरून फुटबॉल खेळून परतत असताना अभिनेता टाईगर श्रॉफच्या बीएमडब्ल्यू (BMW) कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने पोलिसांसमोर मोठा खुलासा केला आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानशी जवळीक असलेल्या टाईगर श्रॉफला का लक्ष्य केले, याचे नेमके कारण समोर आले आहे. गेल्या रविवारी (१८ ऑक्टोबर) टाईगर श्रॉफ जुहू येथील मैदानावरून घरी परतत असताना दोन हल्लेखोराने त्याच्या गाडीवर तब्बल सात राऊंड फायरींग केली आणि एका साथीदारासह मोटरसायकलवरून फरार झाले. या हल्ल्यात अभिनेत्याचा ड्रायव्हर आणि एक पादचारी जखमी झाले. या घटनेची जबाबदारी नंतर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या एका सदस्याने सोशल मीडियावरून स्वीकारली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन मुख्य हल्लेखोरांना सुरत ते जयपूर जाणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेसमधून कोटा रेल्वे स्थानकावर जेरबंद केले.
तपासादरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की, २०२२ मध्ये एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान टाईगर श्रॉफने सलमान खानचा उल्लेख करत तो चित्रपटसृष्टीतील एकमेव ‘टायगर’ असल्याचे म्हटले होते. हाच धागा पकडून गँगने टाईगरला टार्गेट करण्याचा कट रचल्याचा संशय आहे. याआधीही सलमान खानच्या जवळ असणाऱ्या किंवा त्याचे समर्थन करणाऱ्या व्यक्तींना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सतत धमक्या देण्यात आल्या आहेत. (या गँगची सलमान खानसोबतची पाश्र्वभूमी १९९९ मधील काळवीट शिकार प्रकरणापासून चालत आलेली आहे.) आरोपी अटकेत असतानाही पोलिसांच्या तपासाची माहिती सोशल मीडिया आणि इंटरनेट कॉलच्या माध्यमातून घेत होते.
https://www.prahaar.in/2026/10/24/minister-dr-ashok-wuike-appeals-newly-appointed-teachers-tribal-students-quality-education/
गुन्ह्यानंतर आरोपींनी मोबाईल फोन बंद केले होते. मात्र, बोरिवली ते सुरत जाण्यासाठी एका प्रायव्हेट कॅब बुक करताना त्यांनी केलेल्या एका रेग्युलर फोन कॉलमुळे पोलिसांना त्यांचा माग काढणे सोपे झाले. सुरत पोलिसांनी याप्रकरणी दोन जणींना शस्त्र पुरवल्याप्रकरणी अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली दोन शस्त्रे आणि १० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टाईगर श्रॉफ तीव्र मानसिक धक्क्यात आहे. तो अद्याप खूप व्यथित असून त्याने पोलिसांना सांगितले की, आपली कोणाशीही कोणतीही वैयक्तिक दुश्मनी नाही आणि हल्लेखोर कोण आहेत हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे पोलिसांकडून त्याचे अधिकृत स्टेटमेंट अद्याप नोंदवले गेलेले नाही. लवकरच त्याचे जबाब नोंदवून यामागच्या इतर मास्टरमाइंडचा पर्दाफाश केला जाईल, अशी माहिती मुंबई क्राईम ब्रँचने दिली आहे.