रायगड : रायगड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी वृत्त समोर आले आहे. रायगडमधील खालापूर तालुक्यातील माणिवली गावाजवळ एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी अचानक शेड कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या या अपघातात अंदाजे २० ते २५ कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची किंवा जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी ३ कामगारांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते.
नेमकी कशी घडली दुर्घटना ?
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, माणिवली परिसरामध्ये एका मोठ्या लॉजिस्टिक वेअरहाऊसचे (गोडाऊन) बांधकाम दिवस-रात्र सुरू होते. याच बांधकामादरम्यान अचानक वेअरहाऊसच्या शेडची संपूर्ण पोलादी व सिमेंटची रचना (Structure) पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. तिथे शेकडो टन वजनाचे लोखंडी आणि इतर साहित्य कामात व्यस्त असलेल्या मजुरांच्या अंगावर आल्याने एकच हाहाकार उडाला. या भीषण दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या तिघा कामगारांना तात्काळ उपचारासाठी एमजीएम (MGM) रुग्णालयात हलवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
https://www.prahaar.in/2026/10/13/nashik-tcs-case-cases-related-to-the-tcs-conversion-matter-to-be-heard-in-a-single-court-next-hearing-on-october-19/
युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू
ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक स्तरावर मदतकार्य सुरू करण्यात आले. शेडच्या भल्यामोठ्या ढिगाऱ्याखाली आणखी काही कामगार किंवा मजूर अडकले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी वेअरहाऊसच्या परिसरात कसून शोध आणि बचाव मोहीम (Search and Rescue Operation) राबवली जात आहे. स्थानिक पोलिसांच्या कडक सुरक्षेखाली ‘हेल्प फाऊंडेशन’चे (HELP Foundation) स्वयंसेवक या बचावकार्यात जीवाचे रान करून सहभागी झाले आहेत. हे वेअरहाऊसचे शेड अचानक नेमके कशामुळे कोसळले? निकृष्ट साहित्याचा वापर झाला होता का? आणि या दुर्घटनेत नेमकी किती हानी झाली आहे? याबाबतची अधिकृत व सविस्तर माहिती अद्याप प्रतिक्षेत असून पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनेचा अधिक तपास करत आहेत.