अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी येथील ‘रॉयल बेकर्स अँड कन्फेक्षनर्स’ या बेकरीवर कठोर कारवाई करत तिचा अन्न परवाना तात्काळ निलंबित केला आहे. एका सजग ग्राहकाने विकत घेतलेल्या कप केकमध्ये प्लास्टिक आणि रबरचे तुकडे आढळल्याची तक्रार एफडीएकडे केली होती. या गंभीर घटनेची दखल घेत प्रशासनाने ही धडक कारवाई केली. तक्रारीचे गांभीर्य ओळखून अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. अजिंठेकर यांनी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित बेकरीच्या उत्पादन युनिटला अचानक भेट देऊन पाहणी केली. या तपासणीत बेकरीमध्ये अन्न सुरक्षेच्या आणि स्वच्छतेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट झाले.
पाहणी दरम्यान उघडकीस आलेल्या मुख्य त्रुटी
तपासणी अहवालानुसार बेकरीच्या आवारात अनेक गंभीर आणि धोकादायक त्रुटी आढळून आल्या:
- अस्वच्छता व कीटकांचा प्रादुर्भाव: बेकरीमध्ये नियमित स्वच्छता व कीटक नियंत्रण (Past Control) केले जात नव्हते. उघड्यावर कचरा साचलेला होता तसेच खिडक्या आणि दारांना कीटक-प्रतिबंधक जाळ्या लावलेल्या नव्हती.
- कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष: कामगारांची वार्षिक वैद्यकीय तपासणी अथवा लसीकरण झालेले नव्हते. उत्पादनादरम्यान ॲप्रन, हातमोजे (Gloves) आणि हेडगिअर यांसारख्या आवश्यक संरक्षक साधनांचा वापर केला जात नव्हता.
- अयोग्य पॅकेजिंग साहित्य: खाद्यपदार्थांच्या रि-पॅकिंगसाठी बिगर फूड-ग्रेड (Non-food grade) साहित्याचा वापर सुरू होता, ज्यामुळे अन्नात विषारी घटक मिसळण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता.
- चाचणी अहवालांचा अभाव: उत्पादन प्रक्रियेत वापरले जाणारे पाणी आणि तयार अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचे कोणतेही प्रयोगशाळा चाचणी अहवाल (Lab Test Reports) उपलब्ध नव्हते.
- तांत्रिक देखरेखीची कमतरता: संपूर्ण उत्पादन प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी कोणताही प्रशिक्षित किंवा तांत्रिक कर्मचारी उपस्थित नव्हता.
उत्पादन आणि विक्रीवर पूर्ण बंदी
ग्राहकांच्या आरोग्याशी आणि जिवाशी खेळ करणाऱ्या या निष्काळजीपणाची दखल घेत सहायक आयुक्त दयानंद पाटील यांनी ८ ऑक्टोबर २०२६ पासून बेकरीचा अन्न व्यवसाय परवाना तडकाफडकी निलंबित केला. बेकरी प्रशासनाने नमूद केलेल्या सर्व त्रुटी पूर्णपणे दूर करून त्याचा अहवाल सादर करेपर्यंत आणि एफडीएकडून लेखी मान्यता मिळेपर्यंत येथे कोणतेही उत्पादन किंवा विक्री करता येणार नाही. सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी या निलंबन कालावधीत बेकरीवर कडक नजर ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. खाद्यपदार्थांमध्ये काहीही संशयास्पद किंवा असुरक्षित आढळल्यास नागरिकांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.