मुंबई : सत्याची धार आपल्या शब्दांतून जपत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या दैनिक ‘प्रहार’च्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळा रविवार, ११ ऑक्टोबर रोजी दादर येथे होणार आहे. यानिमित्त ‘प्रहार गणेशोत्सव स्पर्धा २०२६’ आणि ‘किलबिल चित्रकला स्पर्धा २०२६’ या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभही आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला दैनिक ‘प्रहार’चे संस्थापक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दादर (पश्चिम) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. दैनिक ‘प्रहार’चे संस्थापक नारायणराव राणे, सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा नीलमताई नारायणराव राणे, दैनिक ‘प्रहार’चे संचालक तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश नारायणराव राणे आणि दैनिक ‘प्रहार’चे संचालक तथा आमदार निलेश नारायणराव राणे यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे.
वर्धापनदिन सोहळ्याच्या निमित्ताने गणेशोत्सवातील उपक्रमांना प्रोत्साहन देणाऱ्या ‘प्रहार गणेशोत्सव स्पर्धा २०२६’ तसेच बालचित्रकारांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘किलबिल चित्रकला स्पर्धा २०२६’मधील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे या सोहळ्यात स्पर्धकांसह त्यांच्या कुटुंबीयांचाही सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे ‘अभंग रिपोस्ट’ यांचा विशेष कार्यक्रम. वर्धापनदिनाचा आनंद, विजेत्यांचा गौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी हा सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ‘प्रहार’ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.