Home नाशिक कुंभमेळा Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांची गर्दी ! कुंभमेळ्यात भाविकांची पायपीट होणार कमी, पोलिसांचे विशेष नियोजन

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांची गर्दी ! कुंभमेळ्यात भाविकांची पायपीट होणार कमी, पोलिसांचे विशेष नियोजन

0
Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांची गर्दी ! कुंभमेळ्यात भाविकांची पायपीट होणार कमी, पोलिसांचे विशेष नियोजन

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेचे आव्हान लक्षात घेऊन नाशिक शहर पोलिसांनी विशेष नियोजन सुरू केले आहे. मागील कुंभमेळ्यात पर्वणीच्या काळात भाविकांना मोठ्या प्रमाणावर पायपीट करावी लागली होती. त्यामुळे यंदा वाहनतळापासून स्नानाच्या घाटापर्यंतचे अंतर कमीत कमी ठेवण्यावर पोलिसांचा विशेष भर आहे.

मागील कुंभमेळ्यातील पायपिटीचा अनुभव

नाशिकमधील गोदाकाठचा कुंभमेळा भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक मानला जातो. देशभरातून तसेच परदेशातूनही भाविक अमृत स्नानासाठी नाशिकमध्ये येणार आहेत. त्यामुळे पर्वणीच्या काळात होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे. मागील कुंभपर्वात विविध मार्गांनी नाशिकमध्ये आलेल्या भाविकांना आठ ते दहा किलोमीटरपर्यंत पायी चालावे लागले होते. यामुळे भाविकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी यंदा वाहनतळ, वाहतूक मार्ग आणि स्नान घाट यांचे नियोजन एकत्रित पद्धतीने करण्यात येत आहे.

चार सूत्रांवर गर्दीचे नियोजन

कुंभमेळ्यातील गर्दीचे नियोजन करताना पोलिसांकडून प्रामुख्याने चार बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

– भाविक नाशिकमध्ये कोणत्या मार्गाने दाखल होतील

– बाह्य वाहनतळांची व्यवस्था

– शहरातील अंतर्गत वाहनतळ आणि बस व्यवस्था

– वाहनतळापासून स्नान घाटापर्यंत भाविकांना चालावे लागणारे अंतर

या नियोजनामुळे भाविकांना शक्य तितक्या कमी अंतरात घाटापर्यंत पोहोचता येणार आहे.

https://www.prahaar.in/2026/10/08/nana-patekars-special-bond-with-nashik-reliving-memories-ranging-from-his-acting-career-to-social-work/

विविध मार्गांवर बाह्य वाहनतळांची व्यवस्था

धुळे, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पेठ, दिंडोरी, गंगापूर आणि त्र्यंबकेश्वर या मार्गांनी येणाऱ्या भाविकांसाठी विविध ठिकाणी बाह्य वाहनतळांची व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये नववा मैल, टाटा मोटर्ससमोरील जागा, मोहगाव-चिंचोली, राजूर बहुला, लाखलगाव, रामशेज, धकांबे, गिरणारे येथील टोमॅटो मार्केट आणि संदीप विद्यापीठाजवळील जागा यांचा समावेश आहे. बाह्य वाहनतळांवर वाहने उभी केल्यानंतर भाविकांना बसच्या माध्यमातून शहरातील अंतर्गत वाहनतळांपर्यंत आणले जाणार आहे.

कोणत्या मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी कोणता घाट ?

भाविकांची गर्दी एकाच ठिकाणी होऊ नये, यासाठी त्यांच्या आगमनाच्या मार्गानुसार वेगवेगळ्या घाटांवर स्नानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

भाविक येण्याचा मार्ग- स्नानासाठी नियोजित घाट

धुळे – टाकळी संगम घाट

पुणे – दसक घाट

मुंबई – लक्ष्मीनारायण घाट

छत्रपती संभाजीनगर – नांदूर घाट

पेठ / दिंडोरी – आनंदवली घाट

गंगापूर रोड – सोमेश्वर घाट

त्र्यंबकेश्वर – टाळकुटेश्वर घाट

या नियोजनानुसार भाविकांना त्यांच्या वाहनतळापासून संबंधित घाटापर्यंत सुमारे २.६ ते ४.१ किलोमीटरपर्यंत पायी चालावे लागू शकते.

रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठीही स्वतंत्र नियोजन

रेल्वेने नाशिकमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांसाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. देवळाली कॅम्प, नाशिकरोड, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या रेल्वेस्थानकांवर उतरणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन त्यांना विविध घाटांकडे वळवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये टाकळी संगम घाट, दसक घाट, ओढा घाट आणि नांदूर घाट या ठिकाणी स्नानाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

रामकुंड परिसर केवळ साधू-महंत आणि आखाड्यांसाठी

अमृत स्नानाच्या दिवशी नाशिक शहरातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी रामकुंड परिसर सर्वसामान्य भाविकांसाठी खुला न ठेवता केवळ साधू-महंत आणि आखाड्यांसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य भाविकांसाठी इतर घाटांवर स्नानाची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे रामकुंड परिसरात होणारी गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे.

वृद्ध आणि दिव्यांग भाविकांसाठी विशेष व्यवस्था

अमृत स्नानासाठी मोठ्या संख्येने वृद्ध आणि दिव्यांग भाविकही नाशिकमध्ये येणार आहेत. त्यांना कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू असून त्याबाबतचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की, भाविकांची पायपीट कमी करण्यासोबतच गर्दीचे योग्य विभाजन आणि सुरक्षित वाहतूक यावर पोलिसांचा मुख्य भर आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाची तयारी वेगाने

कोट्यवधी भाविकांच्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये वाहतूक, पार्किंग, सुरक्षा आणि स्नान घाटांचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. मागील कुंभमेळ्यातील अनुभव लक्षात घेऊन यंदा भाविकांना कमीत कमी पायपीट करावी लागेल आणि गर्दीचे योग्य व्यवस्थापन करता यावे, यासाठी प्रशासनाकडून विशेष आराखडा तयार करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here