Ashok Kharat Case : दैवी शक्ती, मंत्र-तंत्र आणि भविष्याची भीती दाखवून महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोककुमार खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ याच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात संशयिताचे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि पीडितांसह समाजाला न्याय मिळण्याचा अधिकार यामध्ये समतोल साधणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवत नाशिक सत्र न्यायालयाने खरातचा जामीन अर्ज फेटाळला.
पाच महिन्यांहून अधिक काळ कोठडीत
नाशिक सत्र न्यायालयाचे अपर सत्र न्यायाधीश नंदकिशोर एल. मोरे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ७७ मध्ये हा निर्णय दिला. या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली, तर बचाव पक्षातर्फे ॲड. राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणात खरात २९ एप्रिलपासून कोठडीत आहे. जामीन अर्जाच्या सुनावणीपर्यंत त्याची पाच महिने चार दिवसांची कोठडी पूर्ण झाली होती. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाले असून खटला आरोप निश्चितीच्या टप्प्यावर आहे. दोषारोपपत्रात एकूण २० साक्षीदारांचा उल्लेख करण्यात आला आहे.
https://www.prahaar.in/2026/10/05/jalgaon-issue-of-disability-certificates-comes-to-the-fore-at-jalgaon-zilla-parishad-92-employees-face-the-threat-of-disciplinary-action/
ज्योतिष आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांचे शोषण
लष्करातील माजी सैनिक असलेला अशोक खरात निवृत्तीनंतर ज्योतिष व अंकशास्त्राचा व्यवसाय करत स्वतःला देवाचा अवतार मानत हाेता. याच प्रभावाचा गैरवापर करत त्याने अनेक महिलांचे मानसिक व लैंगिक शोषण केले. असाच एक गंभीर प्रकार ७ ते १२ ऑक्टोबर २०२४ दरम्यान घडला हाेता. एका बँकेत व्यवस्थापक असलेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीला खरातने आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. पतीला बाहेर थांबवून, पीडितेच्या कानात मंत्र उच्चारणे, अयोग्य स्पर्श करणे आणि हातावर जादूटोण्याचा दगड फिरवून लैंगिक शोषणाचा प्रयत्न खरातने केला. खरातच्या राजकीय व सामाजिक प्रभावामुळे सुरुवातीला घाबरलेल्या पीडितेने मार्च २०२६ मध्ये इतर पीडित महिलांच्या तक्रारींनंतर धैर्याने पुढे येत पोलिसांत फिर्याद दिली हाेती.
व्हिडीओ फुटेज महत्त्वाचा पुरावा
बचाव पक्षाने अटकेची कारणे न देणे, पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ कोठडी आणि संभाव्य शिक्षेचा कालावधी यांचा आधार घेत जामिनाची मागणी केली होती. मात्र, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हे दावे फेटाळून लावत आरोपीविरुद्ध उपलब्ध पुराव्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. खरातच्या कथित कृत्याचे व्हिडीओ फुटेज उपलब्ध असून ते पीडितेच्या जबाबाला पूरक ठरत असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत खरातला जामीन देणे योग्य ठरणार नसल्याचे स्पष्ट करत अर्ज फेटाळला.
https://www.prahaar.in/2026/10/06/nashik-crime-former-student-blackmails-female-professor-in-nashik-demands-%e2%82%b95-lakh-while-threatening-to-make-private-videos-viral/
खरातविरुद्ध अनेक गुन्हे दाखल
अशोक खरातविरुद्ध नाशिक, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती न्यायालयीन कामकाजातून समोर आली आहे.
– सरकारवाडा पोलीस ठाणे : गुन्हा क्रमांक ७३, ७५ ते ७९, ८१, ८३, ८५, ८७ आणि ९५ असे आठ गुन्हे.
– सिन्नर पोलीस ठाणे : गुन्हा क्रमांक २१३, २२५ आणि २९४ असे तीन गुन्हे.
– राहता पोलीस ठाणे : गुन्हा क्रमांक १२१.
– श्रीरामपूर पोलीस ठाणे : गुन्हा क्रमांक २३९.
– याशिवाय मुंबईतील विशेष न्यायालयात ईडीमार्फत स्वतंत्र खटला सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान कोठडीची मुदत संपल्याने खरात सोमवारी (ता. ५) न्यायालयात हजर केले असता, त्यास न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे. तर नाशिक सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने खरातच्या न्यायालयीन अडचणी कायम राहिल्या आहेत. दरम्यान, त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या इतर प्रकरणांवरही पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.