Nashik Ganesh Visarjan 2026 : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा परिणाम यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर होणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी नाशिकची मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक पंचवटी कारंजा येथे समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा मिरवणूक रामकुंडापर्यंत जाणार नसून मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन म्हसोबा पटांगण परिसरात करण्यात येणार आहे. नाशिक गणेशोत्सव महामंडळाच्या माहितीनुसार, मुख्य मिरवणूक नेहमीच्या मार्गाने वाकडीबारव–मेनरोड–एम.जी. रोड–अशोक स्तंभ–रविवार कारंजा–पंचवटी कारंजा अशी येईल. पंचवटी कारंजा येथे मुख्य मिरवणुकीचा समारोप केला जाणार आहे.
मोठ्या मूर्ती निमाणीमार्गे पुढे
दरवर्षी पंचवटी कारंजा येथून कपालेश्वरमार्गे रामकुंडाकडे मिरवणूक जाते. मात्र, यंदा कुंभमेळ्याच्या कामांमुळे या परिसरातील रस्त्यांची परिस्थिती आणि मोठ्या मूर्ती घेऊन जाण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हा मार्ग बदलण्यात आला आहे. पंचवटी कारंजा येथे मिरवणूक संपल्यानंतर मंडळांचे निवडक कार्यकर्ते पूजेसाठीच्या लहान मूर्ती घेऊन गोदावरी काठाकडे जातील. तर मोठ्या गणेशमूर्ती असलेली वाहने निमाणीमार्गे पुढे महामार्गाच्या दिशेने रवाना होतील. विसर्जनासाठी म्हसोबा पटांगण परिसराचा वापर केला जाणार आहे.
https://www.prahaar.in/2026/09/23/nandurbar-15-year-old-student-from-akkalkuwa-navodaya-vidyalaya-dies-during-treatment/
यंदा २६ मंडळे सहभागी
यंदाच्या मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत २६ गणेश मंडळे सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षी ही संख्या ३५ होती. मात्र, सातपूर, सिडको आणि नाशिकरोड यांसारख्या भागांमध्ये स्थानिक पातळीवर स्वतंत्र विसर्जन मिरवणुका काढल्या जात असल्याने मुख्य मिरवणुकीतील मंडळांची संख्या कमी झाल्याचे गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेट्ये यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुख्य मिरवणुकीत प्रामुख्याने मध्यवर्ती शहरातील गणेशोत्सव मंडळे सहभागी होतात. निवडणूक वर्षात मंडळांची संख्या वाढण्याचा अनुभवही यापूर्वी आला आहे.
मिरवणूक लवकर पुढे नेण्याचे पोलिसांचे नियोजन
यंदाची विसर्जन मिरवणूक संथ होऊ नये, यासाठी पोलिसांकडूनही मंडळांना सूचना देण्यात आल्या आहेत. ढोल पथकात ६० ते ७० जणांची संख्या ठेवण्याचे नियोजन असून, वाहनांची संख्या मर्यादित ठेवण्यास सांगण्यात आले आहे. एका मंडळाकडे पाचपेक्षा अधिक वाहने नसावीत, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच मिरवणूक पुढे नेण्यासाठी प्रत्येक मंडळाने स्वयंसेवक नियुक्त करण्यास सांगण्यात आले आहे.