Home देश थरारक घटना! AC चा स्फोट अन् धुराचे लोट; ३ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं ?

थरारक घटना! AC चा स्फोट अन् धुराचे लोट; ३ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं ?

0
थरारक घटना! AC चा स्फोट अन् धुराचे लोट; ३ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं ?

आदिलाबाद : तेलंगणातील आदिलाबाद येथील ‘राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (Rajiv Gandhi Institute Of Medicle Sciances) रुग्णालयातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या विशेष नवजात देखभाल कक्षात (SNCU) शॉर्टसर्किटमुळे एसीचा (AC) भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत धुराने गुदमरून आतापर्यंत ३ चिमुकल्या नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये अवघ्या ५ दिवसांच्या एका बालकाचाही समावेश आहे. दुर्घटनेच्या वेळी वॉर्डात २४ बालके उपचार घेत होती. घटनेचे गांभीर्य ओळखून २० हून अधिक बालकांना तातडीने इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे.

धुराचे लोट आणि मध्यरात्री उडालेला गोंधळ

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री ११:४० वाजण्याच्या सुमारास घडली. एसी युनिटमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने भीषण आग लागली आणि काही क्षणांतच संपूर्ण SNCU वॉर्डात धुराचे साम्राज्य पसरले. वॉर्डात ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणे असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. रुग्णालयातील कर्मचारी, अग्निशामक दल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. गंभीर स्थितीत असलेल्या २० हून अधिक बालकांना सुपर स्पेशालिटी आणि परिसरातील इतर खासगी रुग्णालयांमध्ये तातडीने हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान निजामाबाद येथे एका बालकाने प्राण सोडले, तर आदिलाबादमध्ये दोघांचा मृत्यू झाला.

अग्निशामक दलामुळे मोठा अनर्थ टळला

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले, ज्यामुळे आग रुग्णालयाच्या इतर वॉर्डांमध्ये पसरली नाही. आदिलाबादचे जिल्हा जिल्हाधिकारी राजर्षी शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचावकार्यादरम्यान २६ आठवड्यांच्या एका प्री-मॅच्युअर (मुदतपूर्व जन्मलेल्या) बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. धुराचा त्रास झालेल्या इतर बालकांवर सध्या बालरोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली व्हेंटिलेटर व अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

या धक्कादायक घटनेनंतर जिल्हाधिकारी राजर्षी शाह आणि पोलीस अधीक्षक अखिल महाजन यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. “ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. आग लागण्याचे नेमके कारण काय होते आणि यात प्रशासकीय किंवा तांत्रिक निष्काळजीपणा झाला आहे का, याची सखोल चौकशी केली जाईल,” असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सध्या प्रशासनाचे संपूर्ण लक्ष बाधित बालकांना योग्य आणि वेळेवर वैद्यकीय उपचार मिळवून देण्यावर आहे. या दुर्घटनेमुळे मृत बालकांच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here