Home ब्रेकिंग न्यूज Maharashtra weather : राज्यात पावसाचे पुनरागमन! ‘या’ भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; अलर्ट जारी

Maharashtra weather : राज्यात पावसाचे पुनरागमन! ‘या’ भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; अलर्ट जारी

0
Maharashtra weather : राज्यात पावसाचे पुनरागमन! ‘या’ भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; अलर्ट जारी

मुंबई : राज्यातील काही भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तापमान वाढले असून उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

https://www.prahaar.in/2026/09/20/electric-shock-in-the-kalachowki-mahaganpati-pandal-area-8-year-old-girl-dies-5-injured/

मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही वादळी पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडू शकतात.

दरम्यान, महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उत्तर अंदमान समुद्राच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही हवामान प्रणाली पुढील काळात ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यात काही ठिकाणी तापमानातही वाढ झाली आहे. सोलापूरमध्ये 36.2 अंश सेल्सिअस कमाल aतापमानाची नोंद झाली. त्यानंतर चंद्रपूर 35.8, अमरावती 35.6 आणि अकोला 35.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. महाबळेश्वरमध्ये राज्यातील सर्वात कमी 17.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गडचिरोलीतील देसाईगंज येथे 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here