मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असून मुंबई आणि ठाण्यात गोविंदा पथकांनी उंच मानवी मनोरे रचले. मात्र दरवर्षी आपल्या विक्रमी कामगिरीने लक्ष वेधून घेणाऱ्या ठाण्याच्या प्रसिद्ध जय जवान गोविंदा पथकासाठी यंदाचा उत्सव अपेक्षेप्रमाणे ठरला नाही. 11 थरांचा नवा इतिहास रचण्याचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरलेल्या जय जवान पथकाला यंदा 10 थरांची कामगिरीही पूर्ण करता आली नाही. (Jai Jawan Govinda Pathak)
https://www.prahaar.in/2026/09/06/latest-figures-on-govinda-accidents-in-mumbai-released-number-of-injured-participants-stands-at-376-286-have-been-discharged/
चार वेळा केला प्रयत्न
उत्सवाच्या दिवशी जय जवान पथकाने तब्बल चार वेळा 10 थरांचा मानवी मनोरा उभारण्याचा प्रयत्न केला. सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी 10 थरांचा प्रयत्न करताना तोल गेल्याने मनोरे कोसळले. दुपारी एका ठिकाणी 9 थरांचा मनोरा यशस्वीरीत्या उभा राहिला, मात्र सलामी देऊन खाली उतरताना तोल गेला. दिवसाच्या अखेरीस सरनाईकांच्या दहीहंडीत पुन्हा दोन वेळा 10 थर रचण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे दिवसभरात चार प्रयत्न करूनही पथकाला एकदाही 10 थरांची यशस्वी रचना करता आली नाही. (Govinda)
पावसामुळे अडचणीत आले खेळाडू
या कामगिरीबाबत माहिती देताना जय जवान पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी सांगितले की, पथकाने गेल्या चार महिन्यांपासून जोरदार सराव केला होता. मात्र ऐनवेळी झालेल्या पावसामुळे पथकातील सुमारे 20 महत्त्वाचे खेळाडू आजारी पडले. मुख्य ठिकाणी खेळणाऱ्या गोविंदांनाच त्रास झाल्यामुळे सरावावर मोठा परिणाम झाला आणि 11 थरांची तयारी असूनही प्रत्यक्षात अपेक्षित रचना पूर्ण होऊ शकली नाही.