इंदापूर : जमिनीच्या वादातून 65 वर्षीय आई-वडिलांना लाकडी काठ्यांनी मारहाण केल्याप्रकरणी दोन मुलांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 ते 6.30 वाजण्याच्या सुमारास सलीम लॉन्सजवळील तरंगवाडी परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. (Indapur Crime)
https://www.prahaar.in/2026/09/02/white-foam-from-the-mouth-and-a-pungent-odor-suspicious-deaths-of-a-husband-and-wife-following-a-domestic-dispute-sensation-in-sangli/
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, तुकाराम किसान राऊत आणि त्यांची पत्नी अंजना राऊत हे रस्त्यावरून जात असताना त्यांचे मुलगे संजय तुकाराम राऊत आणि राजेंद्र तुकाराम राऊत हे कथितरित्या टाटा नेक्सोन गाडीतून तेथे आले. दोघांनी आईच्या नावावर असलेल्या जमिनीवरून आई-वडिलांना जाब विचारला. जमिनीच्या विक्रीबाबत विचारणा करत जमीन परत करण्याची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. (Viral Video)
भररस्त्यात मारहाण केल्याचा व्हिडिओ
यावेळी वाद वाढल्यानंतर दोन्ही मुलांनी आई-वडिलांना लाकडी काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच शिवीगाळ करून जमीन परत न केल्यास पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मारहाणीत दोघे जखमी
या घटनेत तुकाराम राऊत यांच्या पाठीला, चेहऱ्याला, मांड्यांना आणि डाव्या खांद्याला दुखापत झाली. तर अंजना राऊत यांच्या उजव्या मनगटाजवळ आणि कमरेला दुखापत झाल्याची माहिती आहे. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर जखमी दाम्पत्याला वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यात आले.
या प्रकरणी तुकाराम राऊत यांच्या तक्रारीवरून संजय आणि राजेंद्र राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. हे आरोप तक्रार आणि पोलिसांकडे उपलब्ध माहितीनुसार असून, आरोपींवरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत. (Crime News)