‘अँटोनोव्ह एएन-१२४’ द्वारे ४६ टन मालाची यशस्वी वाहतूक
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) प्रगतीमध्ये आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जगातील सर्वात मोठ्या उत्पादनक्षम मालवाहू विमानांपैकी एक असलेल्या ‘अँटोनोव्ह An-124 ‘रुस्लान’ (Antonov An-124 Ruslan) या महाकाय विमानाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वी लँडिंग झाले. कोड F श्रेणीतील हे रुंद आकाराचे मालवाहू विमान अवजड, आकाराने मोठ्या आणि विशेष स्वरूपाच्या मालाची वाहतूक करण्यासाठी सक्षम आहे. अबुधाबीहून सुमारे ४६ टन माल घेऊन आलेल्या या विमानाच्या आगमनातून NMIAची मोठी व विशेष मालवाहू विमाने हाताळण्याची तसेच गुंतागुंतीच्या कार्गो ऑपरेशन्सना सक्षमपणे सहाय्य करण्याची क्षमता अधोरेखित झाली.
‘अँटोनोव्ह एएन-१२४’ हे विमान विशेषतः अत्यंत अवजड आणि अवाढव्य आकाराच्या (Oversized and Heavy Cargo) मालाची वाहतूक करण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या विमानाची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून, त्याचा पुढील भाग (नोझ डोअर) संपूर्णपणे वरच्या बाजूला उघडता येतो. या तांत्रिक सुविधेमुळे मोठ्या आकाराच्या यंत्रसामग्रीची आणि अवजड वस्तूंची चढ-उतार करणे अत्यंत सोपे व सुरक्षित होते.
https://www.prahaar.in/2026/09/02/disha-salian-death-case-100-hope-truth-will-come-out-says-father-of-sushant-singh-rajputs-ex-manager-after-bombay-hc-directs-cbi-probe/
या महाकाय विमानाचे सुरक्षित आगमन आणि उतरवलेला ४६ टन माल, यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षमता जागतिक स्तरावर अधोरेखित झाली आहे. अत्यंत मोठी आणि विशेष श्रेणीतील मालवाहू विमाने हाताळण्यासाठी हे विमानतळ पूर्णपणे सज्ज असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. तसेच, येथील अत्याधुनिक कार्गो सुविधा, धावपट्टीची क्षमता आणि प्रगत लॉजिस्टिक्स यंत्रणा किती सक्षम आहे, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. भविष्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ प्रवाशांसाठीच नव्हे, तर जागतिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीचे (Global Cargo Hub) एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास या यशस्वी लँडिंगनंतर व्यक्त केला जात आहे.