Dhule Crime : शबरी आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे उर्वरित अनुदान मंजूर करून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तसेच ती स्वीकारताना पंचायत समिती साक्री (Panchayat Samiti Sakri) येथील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आणि शासकीय ठेकेदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मनमोहन विजयसिंग राजपूत (३०) असे अभियांत्याचे तर रोहन रोहिदास देवरे (३१) असे शासकीय ठेकेदार आरोपीचे नाव आहे.
https://prahaar.in/2026/08/18/nashik-death-of-two-little-girls-what-exactly-happened-in-nashik/
…अन् लाचखोरांनी डाव साधला
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांना मौजे जामदे (ता. साक्री) येथे शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर झाली होती. अनुदानाचा काही भाग मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी घरकुलांचे बांधकाम सुरू केले. त्यानंतर उर्वरित अनुदानाचे हप्ते मिळण्यासाठी साक्री पंचायत समिती येथे पाठपुरावा सुरू होता. शासन मदत होती, सरकारी बाबूच्या खिशातून पैसा जाणार नव्हता, पण पैसे आपल्या खिशात वळवण्यासाठी लाचखोरांनी डाव साधला.
https://prahaar.in/2026/08/18/gramsevak-dies-of-a-heart-attack/
अनुदान मंजूर करण्यासाठी पुन्हा २० हजार
तक्रारीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मनमोहन राजपूत याने अनुदानाचे काही हप्ते मंजूर केल्याच्या मोबदल्यात प्रत्येक घरकुलधारकाकडून पाच हजार रुपये, असे एकूण २५ हजार रुपये घेतले होते. त्यानंतरही हाव संपली नाही. उर्वरित अनुदान मंजूर करण्यासाठी त्याने पुन्हा २० हजार रुपयांची लाच मागितली. या पार्श्वभूमीवर १३ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रारदार पंचायत समिती साक्री येथे गेले असता मनमोहन राजपूत याने २० हजार रुपयांची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने १७ ऑगस्ट रोजी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, (धुळे) गाठले आणि तक्रार दाखल केली.
https://prahaar.in/2026/08/18/nashik-crime-32-year-old-man-dies-during-treatment/
लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
एसीबीने पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता आरोपी मनमोहन राजपूत याने तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांच्या घरकुलांचे उर्वरित अनुदान मंजूर करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. सापळा कारवाईदरम्यान साक्री शहरातील धुळे रोडवरील शेवाळी फाट्याजवळ मनमोहन राजपूत यांनी शासकीय ठेकेदार रोहन देवरे यांच्या हस्ते तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही पंचांसमक्ष रंगेहात पकडले. या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.