Tuesday, August 18, 2026

Nashik Crime : 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, मग प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या जोडीदाराचा काटाच काढला ; अन् मृतदेह...

Nashik Crime : 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, मग प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या जोडीदाराचा काटाच काढला ; अन् मृतदेह...

Nashik Crime : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 15 वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपचा (Live-in Relationship) रक्तरंजित शेवट झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. 37 वर्षीय हसीना हबीब शेख हिने 15 वर्षांपासून तिच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या वसंत गोरखनाथ सातपुते याची हत्या केली आहे. तिच्या आयुष्यात नवीन प्रियकराची एंट्री झाल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यातून दोघांनी हत्या केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे त्यांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या जोडीदाराची तिने प्रियकराच्या मदतीने हत्या करून मृतदेह कसारा घाटातील जंगलात फेकून दिल्याचे समोर आले आहे. (Nashik Crime News )

महिलेसह चार संशयित ताब्यात

शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकने या प्रकरणाचा उलगडा केला. या प्रकरणी महिलेसह चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. वसंत गोरखनाथ सातपुते (४०, रा. स्वराज्यनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ५ ऑगस्ट २०२६ पासून तो बेपत्ता असल्याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकमार्फत सुरू होता. या शाखेतील पोलीस हवालदार नाझिमखान पठाण व मुक्तार शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत या गुन्ह्यातील वसंत सातपुते याचा हसीना शेख व साहिल शहा यांनी त्यांच्या साथीदारांसह मिळून खून केला असून ते सध्या शालिमार परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ कारवाई करीत पथक रवाना केले. संशयित व्यक्ती व महिलेचा सीबीएस परिसरात शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. (Nashik Crime News )

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा परिसरातील स्वराज्यनगरमधील रो-हाऊसमध्ये वसंत सातपुते आणि हसीना शेख हे मागील सुमारे 15 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, वसंत बेरोजगार असल्याने त्यांचा खर्च हसीना करत होती. दरम्यान, हसीनाच्या आयुष्यात साहिल शहा नावाच्या व्यक्तीची एंट्री झाली. यानंतर जुन्या नात्यातील तणाव वाढला आणि प्रेमाच्या त्रिकोणातून संघर्षाची ठिणगी पडल्याचे तपासात समोर येत आहे. 5 ऑगस्टच्या सायंकाळी वसंत घरात झोपलेले असताना हसीनाचा कथित प्रियकर साहिल शहा त्यांना भेटण्यासाठी घरी आला. त्यावेळी वसंत यांना जाग आली. साहिलला पाहिल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद आणि झटापट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या झटापटीदरम्यान साहिलने हसीनासमोरच वसंत यांचा गळा आवळून त्यांची हत्या केल्याची माहिती मिळत आहे.(Nashik Crime News )

मृतदेह 18 तास होता घरात

घटनेनंतर हसीनानेही साहिलला साथ देत पुरावे नष्ट करण्याचा कट रचल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे हत्या झाल्यानंतर मृतदेहाची तातडीने विल्हेवाट न लावता तो काही काळ घरातच ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. मृतदेह तब्बल 18 तास घरात ठेवण्यात आला आणि त्यानंतर मध्यरात्री तो कारमध्ये ठेवण्यात आला. यानंतर हसीना आणि तिच्या साथीदारांनी मृतदेह कारमधून कसारा घाटाच्या दिशेने नेला. कसारा घाटातील दरीत मृतदेह फेकून देण्यात आला. या प्रकारातून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >