– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; अमेरिकेतील कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढणार
मुंबई : “राज्याचा आर्थिक विकास वेगाने होत असून, सद्यस्थितीत सुरू असलेला विकासाचा वेग पाहता आगामी दोन वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि युएई या देशांच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकेल”, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला. मुंबईत इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. ( Devendra Fadnavis)
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जर महाराष्ट्र हा एक स्वतंत्र देश असता, तर तो जगातील विसाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरला असता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असून, त्यात महाराष्ट्र अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. याच जोरावर आगामी दोन वर्षांत राज्याचा जीडीपी सिंगापूर आणि युएईसारख्या अर्थव्यवस्थांच्या पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ( Maharashtra Economy)
https://prahaar.in/2026/08/18/chief-minister-to-exercise-control-over-ministers-from-coalition-partners-holds-the-authority-to-overturn-any-ministers-decisions-stir-within-shiv-sena-and-ncp-camps/
इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना आणि भारतामधील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांच्याशी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत तंत्रज्ञान, उच्च शिक्षण, सेमीकंडक्टर, डेटा सेंटर आणि डीप टेक या क्षेत्रांतील गुंतवणुकीवर सविस्तर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अमेरिकेतील कंपन्यांची महाराष्ट्रासोबत भागीदारी करून येथे एक मोठी औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याची इच्छा असून, यासंदर्भातील चर्चा अत्यंत सकारात्मक आणि फलदायी ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (UAE Economy)
दरम्यान, पुणे मेट्रोच्या (शिवाजीनगर ते हिंजवडी) बहुतांश काम पूर्ण होत आले असून, लवकरच या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले असून ते उपस्थित राहतील, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच, अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) सुरू असलेल्या कारवाईचे समर्थन करत, जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.