Home महाराष्ट्र नाशिक Devendra Fadnavis : नाशिकमधील खड्ड्यांवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना झापले

Devendra Fadnavis : नाशिकमधील खड्ड्यांवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना झापले

0
Devendra Fadnavis : नाशिकमधील खड्ड्यांवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना झापले
Devendra Fadanvis

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक; गुणवत्ता सुधारण्यासाठी एक महिन्याचा अल्टीमेटम

मुंबई : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय यंत्रणेला कठोर शब्दांत फटकारले आहे. “महाकुंभ तोंडावर असताना असे रिलॅक्स राहून चालणार नाही. लोकांना तांत्रिक कारणे सांगू नका, तर कामातून प्रत्यक्ष तोडगा काढून द्या,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. तसेच रस्त्यांची दुरवस्था आणि कामाचा दर्जा सुधारण्यासाठी संबंधित विभागांना एका महिन्याचा अल्टीमेटम दिला आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा २०२७’ च्या पूर्वतयारीचा आणि विकासकामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, सरोज आहिरे, हिरामण खोसकर, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

https://prahaar.in/2026/08/07/devendra-fadnavis-master-plan-for-a-324-sq-km-area-for-third-mumbai/

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात कुंभमेळ्याच्या धर्तीवर अनेक मोठे पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि विकासकामे सुरू आहेत. मात्र, या कामांमुळे शहरातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांची पूर्णपणे दुरवस्था झाली असून जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक गंभीर अपघात झाले आहेत. या वाढत्या अपघातांमुळे नाशिककरांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली.

फडणवीस म्हणाले, “शहरात इतका मोठा निधी खर्च करून विकासकामे होत असताना, नागरिकांकडून जर प्रशासनाविरोधात रोष येत असेल, तर आपण कुठे चुकतो आहोत याचे आत्मपरीक्षण अधिकाऱ्यांनी केले पाहिजे. खड्डे बुजवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्या यंत्रणांवर आणि कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करा, त्यांचे पुढील काम थांबवा,” असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच अधिकाऱ्यांनी चेंबरमध्ये बसून न राहता फिल्डवर जाऊन काम करावे आणि मल्टिपल एजन्सीजशी संवाद ठेवावा, असेही त्यांनी सुनावले. पुढील एका महिन्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेतली जाईल आणि त्या वेळी कामात गुणात्मक सुधारणा दिसली नाही, तर गंभीर सामोरे जावे लागेल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिला.

https://prahaar.in/2026/08/07/devendra-fadnavis-in-the-first-phase-6-lakh-22-thousand-207-farmers-will-get-seven-day-quota/

१० ते १२ कोटी भाविक येण्याची शक्यता

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी विकासकामांना अधिक गती देण्याच्या आणि गुणवत्तेबाबत सूचना दिल्या आहेत. यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे १० ते १२ कोटी भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुंभमेळ्यासाठी जवळपास ४० हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याने प्रत्येक काम वेळेत आणि दर्जेदार होणे बंधनकारक आहे,” असे महाजन यांनी स्पष्ट केले.

शहरातील आऊटर रिंगरोड हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून, त्याच्या अंमलबजावणीतील कंत्राटदारांच्या सर्व अडचणी दूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या सुरू असलेल्या कामांमुळे नाशिकच्या नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याची वस्तुस्थिती मान्य करत त्यांनी प्रशासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. मात्र, पावसाच्या काळातही सर्व रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून ते वाहतूकयोग्य (मोटरेबल) करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून, त्यानुसार युद्धपातळीवर काम सुरू केले जाईल, अशी ग्वाही महाजन यांनी दिली. तसेच कुंभमेळ्याच्या नियोजनात शहरात अधिक हरित क्षेत्र (ग्रीन झोन) निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here