तुम्ही दिवसभरात किती पाणी पिता? आपल्या शरीराला किती लीटर पाणी पुरेसे असते, अति प्रमाणात पाणी प्यायल्याने काय दुष्परिणाम होतात? पाणी कधी आणि कसे प्यावे?
सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या:
मानवी शरीराचा सुमारे साठ टक्के भाग पाण्यानं बनलेला असतो. पाण्यामुळे रक्ताभिसरण आणि पचनक्रिया सुरळीत राहते. शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाणी गरजेचं आहे. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर थकवा, डोकेदुखी, चक्कर येणं आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे.
साधारणपणे, दिवसाला अडीच ते तीन लिटर पाणी पिणं पुरेसं मानलं जातं. कष्टाचं काम किंवा उन्हात वावरल्यामुळे, खूप घाम येत असेल तर हे प्रमाण तीन ते चार लीटरपर्यंत वाढू शकतं. मात्र, एका दिवसात सहा ते आठ लीटर किंवा त्याहून अधिक पाणी पिणं हानिकारक ठरू शकतं.
अतिप्रमाणात पाणी प्यायलात, तर शरीरातील सोडियमसारखी खनिजं विरळ होतात. याचा परिणाम मेंदू, हृदय आणि मूत्रपिंडांवर होऊ शकतो. या स्थितीला ‘वॉटर टॉक्सिसिटी’ किंवा ‘वॉटर पॉयझनिंग’ असंही म्हटलं जातं. यात गोंधळल्यासारखं वाटणं, चक्कर येणं आणि बेशुद्ध पडणं अशी लक्षणं दिसतात.
https://prahaar.in/2026/08/06/think-twice-before-throwing-them-away-create-these-8-amazing-things-from-an-old-saree/
खूप कमी पाणी प्यायलानं शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, ज्याला डिहायड्रेशन म्हणतात. याचे परिणाम सर्वप्रथम त्वचा, लघवी आणि ऊर्जेच्या पातळीवर दिसून येतात. त्वचा कोरडी पडणं, लवकर थकवा जाणवणं आणि सतत डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो.
पाणी कधी आणि कसे प्यावे?
- सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास पाणी पिणं फायदेशीर असतं.
- जेवणाआधी अर्धा तास पाणी प्यायल्यानं पचनक्रियेस मदत होते.
- जेवणानंतर लगेच पाणी पिणं टाळावं.
- दिवसभरात गरजेनुसार थोड्या-थोड्या प्रमाणात पाणी पिणं चांगलं असतं.
https://prahaar.in/2026/08/06/shrinivas-vinayak-kulkarni-a-brilliant-era-in-marathi-literature-has-come-to-an-end-the-chief-minister-paid-tribute-to-shri-v-kulkarni-editor-of-mauj-magazine-and-author-of-doh/
पाण्याची गरज ही त्या व्यक्तीचे वय, शारीरिक हालचालींचे प्रमाण, ऋतू आणि शरीराची रचना यांसारख्या घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे, सर्वांसाठीच पाण्याची एखादी निश्चित मात्रा लागू करता येत नाही; तरीही, 2.5 ते 3 लीटर हे प्रमाण सरासरी निकष म्हणून मानलं जाऊ शकतं.