नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. न्यायालयातील सुनावणीवरून राऊत करत असलेल्या वक्तव्यांना त्यांनी “पतंगबाजी” असे संबोधत, आधी स्वतःचा पक्ष सांभाळावा आणि त्यानंतर इतरांवर टीका करावी, असा टोला लगावला.
नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हस्के (Naresh Mhaske) म्हणाले की, न्यायालयात सुनावणी सुरू असताना संजय राऊत जणू न्यायाधीशांनी त्यांच्या कानातच निकाल सांगितल्याप्रमाणे वक्तव्ये करत आहेत. अशा प्रकारच्या दाव्यांना कोणताही आधार नसून ती केवळ राजकीय पतंगबाजी असल्याचे त्यांनी म्हटले.
https://prahaar.in/2026/08/06/death-threat-to-zeeshan-siddique-following-baba-siddiques-murder/
‘निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले’ :
नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयात शिवसेनेत कोणतीही फूट नसल्याचे निरीक्षण नोंदवत पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दिले आहे. त्यामुळे या निर्णयाचा अभ्यास करूनच संजय राऊत यांनी वक्तव्य करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, सत्तेसाठी ठाकरे गटाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर जात काँग्रेससोबत हातमिळवणी केली. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांची आठवण इतरांना करून देण्याचा नैतिक अधिकार त्यांना उरलेला नाही.
‘न्यायालयाचा निर्णय अनुकूल असेल तेव्हाच कौतुक’ :
म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आरोप केला की, न्यायालयाचा निर्णय अनुकूल वाटला तर त्याचे स्वागत केले जाते, मात्र प्रतिकूल निर्णय आल्यास न्यायालय आणि न्यायमूर्तींवरच टीका केली जाते. ही भूमिका लोकशाही संस्थांबाबत योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
‘उबाठा गट सांभाळा, मग शिंदेंवर बोला’ :
शिवसेनेचा हिंदुत्वाचा विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर आमचा पूर्ण विश्वास असल्याचे सांगत म्हस्के (Naresh Mhaske) म्हणाले, “उबाठा गटातील उरलेले नेते आणि कार्यकर्ते टिकवण्यासाठी संजय राऊत सातत्याने बेताल विधाने करत आहेत. आधी स्वतःचा पक्ष सांभाळा, मग एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करा.”
https://prahaar.in/2026/08/06/prashant-kishor-met-sunetra-and-parth-pawar-held-a-closed-door-meeting-at-devgiri/
विलीनीकरणाच्या चर्चेवरही निशाणा :
ठाकरे गट काँग्रेसमध्ये किंवा अन्य पक्षात विलीन होण्याच्या चर्चांवरही नरेश म्हस्के यांनी भाष्य केले. इतर पक्षांना सल्ले देण्याऐवजी ठाकरे गटाने स्वतःच्या राजकीय भवितव्याचा विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, उबाठा गटातील आमदार, खासदार आणि नगरसेवक पक्षात टिकवण्याचे आव्हान नेतृत्वासमोर असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केलेले हे सर्व आरोप आणि दावे हे त्यांचे राजकीय मत असून, त्यावर ठाकरे गट किंवा संजय राऊत यांच्याकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.