मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक ताशेऱ्यांनंतर आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईच्या धसक्याने मंत्रालयातील उपाहारगृहाचे (कँटिन) रूप एका झटक्यात बदलल्याचे समोर आले आहे. कालपर्यंत अस्वच्छता आणि नियमांच्या उल्लंघनामुळे चर्चेत असलेल्या याच कँटिनमध्ये आता अचानक स्वच्छता आणि सुरक्षेचे काटेकोर नियम पाळले जात असल्याचे दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांच्या हातात हँडग्लोव्हज, डोक्यावर कॅप्स आणि खाद्यपदार्थांवर करकरीत नवीन जाळ्या झाकलेल्या दिसत आहेत. आज सकाळी हायकोर्टात झालेल्या सुनावणीनंतर एफडीए आणि वकिलांच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली आहे.
https://prahaar.in/2026/07/31/navnath-ban-sanjay-raut-and-rahul-gandhi-will-go-down-in-history-as-runaway-opponents/
हायकोर्टाकडून एफडीएची कानउघाडणी
तत्पूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने मंत्रालयातील कँटिनच्या स्वच्छतेवरून आणि एफडीएच्या ‘९८ टक्के स्वच्छतेच्या’ दाव्यावरून जोरदार कानउघाडणी केली होती. सुनावणीदरम्यान एफडीएच्या वकिलांनी कँटिन ९८ टक्के स्वच्छ असल्याचा दावा केला होता. यावर न्यायालयाने खोचक सवाल करत म्हटले की, “मोठमोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्येही एखादी माशी किंवा झुरळ आढळू शकते, मग मंत्रालयाचे कँटिन इतके निर्दोष कसे असू शकते? एवढ्या मोठ्या उपाहारगृहात एकही कीटक आढळला नाही यावर कसा विश्वास ठेवायचा?”
तसेच, एफडीएने न्यायालयात केवळ काही फोटो सादर केल्यामुळे न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तपासणीचे फोटो न दाखवता व्हिडिओ का काढला नाही, असा थेट सवाल करत हायकोर्टाने आज दुपारी ३ वाजेपर्यंत कँटिनचे व्हिडिओ सादर करण्याचे सक्त निर्देश दिले होते.
https://prahaar.in/2026/07/31/nreview-of-sadhugram-planning-for-nashik-and-trimbakeshwar-for-simhastha-at-the-divisional-commissioners-office/
कँटिनमध्ये अचानक बदल
कोर्टाच्या या दणक्यानंतर मंत्रालयाच्या कँटिनमध्ये अन्न सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना तातडीने लागू करण्यात आल्या आहेत. सर्व अन्नपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवले जात असून कर्मचारी पूर्ण स्वच्छतेची काळजी घेताना दिसत आहेत. मात्र, एका रात्रीत झालेला हा बदल पाहून मंत्रालय कर्मचारी आणि सामान्य नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. प्रशासनाच्या या अचानक जागृतीमुळे आता अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.