– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कुणाला न्याय मिळत नसल्याची भावना असेल, तर संवादातून मार्ग काढू
मुंबई : “मराठा समाजाच्या हितासाठी आणि कल्याणासाठी महायुती सरकारने जितके निर्णय घेतले आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली, तेवढे निर्णय यापूर्वी राज्यातील कोणत्याही सरकारने घेतलेले नाहीत. असे असतानाही जर कोणाच्या मनात काही शंका किंवा न्याय मिळत नसल्याची भावना असेल, तर राज्य सरकार संवादातून नक्कीच योग्य मार्ग काढण्यास तयार आहे,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. (Maratha Reservation)
राज्यात सापडलेल्या ५८ लाख कुणबी नोंदींच्या आधारे मराठा समाजाला प्रमाणपत्रे दिली जात नसल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला होता. यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्यांनी ज्यांनी नियमानुसार जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत, त्या बहुतांश नागरिकांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. सध्या यासंदर्भातील प्रलंबित प्रकरणांची संख्या अत्यंत कमी आहे. तरीही काही पात्र व्यक्ती यापासून वंचित राहिल्याचे कोणाला वाटत असेल, तर सरकार त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध आहे. (Mahayuti Government)
नीट पेपरफुटीबाबत मुंबईसह राज्यात झालेल्या आंदोलनादरम्यान महाराष्ट्र पोलिसांनी अत्यंत संयमाची भूमिका घेतली होती. या काळात विद्यार्थ्यांवर प्रामुख्याने जमावबंदीचे जे गुन्हे दाखल झाले आहेत, ते सर्व गुन्हे मागे घेण्याचे स्पष्ट आदेश पोलीस आणि गृह विभागाला देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
https://prahaar.in/2026/07/29/ban-on-the-sale-of-junk-food-including-items-high-in-fat-salt-and-sugar-within-school-premises-directives-issued-by-the-food-and-drug-administration/
बोगसगिरी रोखल्याने पीक विम्याच्या लाभार्थ्यांची संख्या घटली
एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्याच्या तक्रारींवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “राज्य सरकारने अवघ्या एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बोगस अर्ज दाखल झाल्याचे निदर्शनास आले होते. या गैरप्रकारांवर सरकारने कठोर कारवाई केल्यामुळेच आता पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळत असून, लाभार्थ्यांची संख्या नैसर्गिकरीत्या नियंत्रित झाली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
देशात अराजकता माजवणे हाच राहुल गांधींचा उद्देश
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भाषणात कोणताही नवीन मुद्दा किंवा युवकांच्या कल्याणाचा ठोस अजेंडा नसतो. देशात अराजकता माजवणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारने आणलेल्या परीक्षा फुटीविरोधी कायद्यामुळे देशातील युवकांचे भवितव्य सुरक्षित होणार आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले,।, दरम्यान, गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या नावाने झळकलेल्या बॅनरबाबत बोलताना, काही स्वार्थी तत्त्वांनी स्वतःच्या फायद्यासाठी ही पत्रके लावली असून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.