गुरुविण कोण दाखवील वाट ?
‘गुरूपौर्णिमा’ हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजनदेखील केले जाते. गुरूपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात. कारण महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान जगासमोर उघड केले. व्यासांनी महाभारत हा अलौकिक ग्रंथ लिहीला. तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच गुरूपौर्णिमेला व्यासपूजन देखील केले जाते. सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरू म्हणजे ‘आई’. कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते. आई आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवते. जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरू म्हणजेच आईकडून घेतो. एवढंच नाहीतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते. आईप्रमाणेच वडील आणि पुढे अनेक शिक्षक, मित्र, चांगली पुस्तके आपली गुरू असू शकतात. गुरू अथवा शिक्षक हा देवाप्रमाणे असतो या शिकवणीमुळेच भारतात गुरूपौर्णिमा मनापासून आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते.- राजू जाधव, मांगूर, जि. बेळगांव
गुरुंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस!
ज्ञान, संस्कार आणि आपले सुसंस्कृत जीवन घडवणाऱ्या गुरुंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा! आषाढ महिन्यातील पौर्णिमेचा हा दिवस भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी महाभारतासारखे महाकाव्य रचणाऱ्या आणि आद्यगुरु मानल्या गेलेल्या महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. त्यामुळे या दिवसाला ‘व्यास पौर्णिमा’ असेही म्हटले जाते. खरे तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात माहितीचा महापूर आलेला असताना समाजातून सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. या वेगवान जगात गुरु म्हणजे आपले शाळा, महाविद्यालयातील शिक्षक एवढीच मर्यादित परिभाषा राहिली नसून आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक (मेंटॉर्स) म्हणजे जीवन अधिक सुकर करणारे गुरु, असे गुरु या संज्ञेला व्यापक स्वरूप मिळाले आहे. अशा आयुष्याच्या अनेक टप्प्यावर जीवनाचे तारू सुखरूपपणे पैलतीरावर नेणाऱ्या गुरुंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी सर्वांना शुभेच्छा! – प्रदीप अनुसया शंकर मोरे, अंधेरी (पूर्व)
गुरुपौर्णिमा : गुरुंच्या ऋणाची कृतज्ञ आठवण
२९ जुलै रोजी साजरी होणारी गुरुपौर्णिमा ही भारतीय संस्कृतीतील ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. महर्षी वेदव्यास यांच्या स्मरणार्थ हा दिवस ‘व्यास पौर्णिमा’ म्हणूनही साजरा केला जातो. गुरु केवळ शिक्षण देत नाहीत, तर विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व घडवतात, विवेक जागवतात आणि जीवनाला योग्य दिशा देतात. आज माहिती सहज उपलब्ध असली, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेटचा वापर वाढला असला, तरी माहितीचे ज्ञानात रूपांतर करणारा आणि मूल्यांची जाणीव करून देणारा गुरुच असतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणानेही शिक्षकांच्या मार्गदर्शक भूमिकेला अधिक महत्त्व दिले आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या जीवनात प्रकाश पाडणाऱ्या सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. त्यांच्या ऋणाची परतफेड शक्य नसली, तरी त्यांचे संस्कार आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.- प्रा. विजय कोष्टी, कवठे महांकाळ, जि. सांगली
गुरुपौर्णिमा : ज्ञानाचा आणि कृतज्ञतेचा पवित्र सोहळा
आषाढ पौर्णिमेला साजरी होणारी गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील भक्ती आणि कृतज्ञतेचा पवित्र सण आहे. ‘गु’ म्हणजेच अंधार आणि ‘रु’ म्हणजेच प्रकाश; जो आपल्यातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो, तो गुरू होय. महर्षी वेद व्यास यांच्या जयंतीनिमित्त साजरी होणारी ही पौर्णिमा आपल्याला प्राचीन संस्कृतीशी जोडते. पहिली अक्षरं गिरवायला शिकवणारे शिक्षक, योग्य दिशा दाखवणारे आई-वडील आणि जीवनाचे मर्म सांगणारे आध्यात्मिक गुरु हे सर्वजण वंदनीय आहेत. गुरूंच्या आशीर्वादाने आयुष्यातील संकटांवर मात करण्याची ताकद मिळते. शिष्याचे प्रगल्भ आयुष्य हेच खऱ्या अर्थाने गुरूंच्या तपश्चर्येचे फलित असते. या पवित्र दिवशी आपण आपल्या गुरूंप्रती कृतज्ञ राहण्याचा संकल्प करूया.- जयवंत नारायण चव्हाण, दापोली
गणेश मूर्तिकारांची मानसिकता जाणून घ्या
पंतप्रधान मोदी यांनी, मन की बात या कार्यक्रमात यंदाच्या गणेशोत्सवात, प्लॅस्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्याच मूर्ती स्थापन करा असे जनतेला आवाहन केले आहे. मोदींची कल्पना चांगली आहे. परंतु या गोष्टी आयत्या वेळेस सांगून त्याची अंमलबजावणी करणे फार कठीण आहे. या दोन्हीमध्ये कारागिरांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार केल्यास, पर्यावरणाचा ऱ्हास होतो अशी ओरड केली जाते, तर शाडूची माती प्रामुख्याने गुजरात किंवा राजस्थानमधून आणावी लागते. आता मातीच्या मूर्तीबाबत बोलायचे झाल्यास मातीची मूर्ती तयार करायला व वाळायला प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत जास्त दिवस लागतात. मातीच्या मूर्ती ओल्या असतात किंवा सुकल्यावर कच्च्या असतात. त्यामुळे त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना भंगण्याची शक्यता असते. मोदींनी जनतेला मातीच्या मूर्ती वापरा असे सांगितले असले तरी, याबाबत जनतेची तसेच मूर्तिकारांची मानसिकता जाणून घेणे गरजेचे आहे.
– गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली (पूर्व)