‘सीजेपी’च्या आंदोलनाने जोर धरल्यानंतर, वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी ठाकरे बंधू पुढे सरसावले नसते तर नवलच! प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर ठाकरे बंधूंनी मुंबईत शिवाजी पार्कात विजयी मोर्चा काढला. या आंदोलनात स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न हास्यास्पदच होता. म्हणूनच ‘वरातीमागून घोडे’ ही म्हण सध्या ठाकरे बंधूंना तंतोतंत लागू पडते.
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि एकूणच देशाच्या सार्वजनिक जीवनात सध्या जी वैचारिक घसरण पाहायला मिळत आहे, ती अत्यंत चिंताजनक आणि लोकशाहीच्या आरोग्यासाठी घातक आहे. आजच्या राजकारणात विकासाचे मुद्दे मागे पडून केवळ सवंग प्रसिद्धी, भावनिक आवाहन आणि व्यक्तिगत चिखलफेक याला प्राधान्य दिले जात आहे, ज्याचा तीव्र निषेध करायलाच हवा. महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेभोवती सध्या मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उबाठाच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची झालेली फाळणी आणि राज ठाकरेंच्या मनसेचा निवडणुकीतील सातत्यपूर्ण घसरलेला जनाधार, यावरून या दोन्ही नेत्यांना पूर्वीसारखी राजकीय विश्वासार्हता राहिलेली नाही, हेच स्पष्ट होते. राजकीय स्वार्थ आणि सत्तेची समीकरणे साधण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेलाच दोघांनीही कशी तिलांजली दिली आहे, याची प्रचिती जनता घेत आहे. ‘सीजेपी’च्या आंदोलनाने जोर धरल्यानंतर, वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी ठाकरे बंधू पुढे सरसावले नसते तर नवलच! प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर ठाकरे बंधूंनी मुंबईत शिवाजी पार्कात विजयी मोर्चा काढला. या आंदोलनात स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न हास्यास्पदच होता. म्हणूनच ‘वरातीमागून घोडे’ ही म्हण सध्या ठाकरे बंधूंना अगदी तंतोतंत लागू पडते. वेळ निघून गेल्यानंतर जाग आलेली दिसते. दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय घेण्यासाठी जणू या नेत्यांमध्ये स्पर्धाच लागल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या आंदोलनाचे स्वरूप आणि त्यामागील पार्श्वभूमी अत्यंत विचार करायला लावणारी आहे. या आंदोलनात नेमके कोण होते? गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक आणि ज्यांना भारताचे तुकडे करायचे आहेत अशा प्रवृत्ती यामागे सक्रिय असल्याचे दिसून आले. अशा संवेदनशील विषयांवर केवळ राजकीय पोळी भाजून घेणे, हे देशाच्या हिताचे नाही. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण हे त्यांना आलेले राजकीय नैराश्य, वैफल्य दाखवून देते. आता ‘भाजप विरुद्ध भारत’ असा संघर्ष सुरू झाला असून, ही लढाई ‘अंधभक्ती विरुद्ध देशभक्ती’ची आहे, अशी चिथावणीखोर विधाने त्यांनी केली. मुळात, ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि काँग्रेसच्या वळचणीला जाऊन देशभक्तीची व्याख्या बदलली, त्यांनी तरी किमान देशभक्तीच्या गप्पा मारू नयेत. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात मोदींना मते चोरता येतात, माणसे नाही, अशी मुक्ताफळे उधळली; परंतु त्यांना या गोष्टीचा सोयीस्कर विसर पडला की, २०१९ मध्ये भाजपसोबत युती करून आणि हिंदुत्ववादी जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत संसार थाटण्याचे पाप नेमके कोणी केले होते? सत्तेच्या लालसेपोटी जनादेशाला पाठ दाखवून महाविकास आघाडी स्थापन करणाऱ्यांनी आज इतरांना नैतिकतेचे धडे शिकवणे हास्यास्पद आहे.
याच राजकीय गदारोळात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना हिटलरशी करणारा टी-शर्ट घालून आपल्या पोरकटपणाचे स्पष्ट दर्शन घडवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी खरोखरच हिटलर असते, तर देशात असे ‘जेन-झी’ किंवा इतर आंदोलने करता आली असती का? काही मूठभर भरकटलेले तरुण शिवीगाळ करत होते त्यांनी समजून घ्यावे की, पंतप्रधान मोदींच्या रील्सना आणि व्हिडिओंना समाजमाध्यमांवर मिळणारे विक्रमी व्ह्यूज हेच दर्शवतात की, देशातील बहुसंख्य तरुण वर्ग आजही मोदींच्या पाठीशी विश्वासाने उभा आहे. मूठभर विघ्नसंतोषी प्रवृत्तींच्या आरडाओरड्यामुळे मोदींची लोकप्रियता कमी झालेली नाही. विरोधकांच्या खोट्या ‘नॅरेटिव्ह’ आणि अपप्रचाराला मोदींच्या एका रीलने सणसणीत चपराक दिली आहे. प्रश्नपत्रिका फुटणे, वाढती बेरोजगारी आणि शिक्षणव्यवस्थेतील गंभीर त्रुटी या समस्या सोडवण्यासाठी लोकशाही मार्गाने आवाज उठवणे अजिबात चुकीचे नाही. परंतु, कोणत्याही आंदोलनाची खरी ताकद केवळ त्याच्या मागण्यांवर अवलंबून नसते, तर ती आंदोलनाची भाषा, पद्धत आणि वर्तणूक याद्वारे ठरत असते. जेव्हा विचार आणि चर्चेची जागा शिवीगाळ किंवा वैयक्तिक अपमानाने घेतली जाते, तेव्हा साहजिकच त्या आंदोलनाचा नैतिक दर्जा घसरू लागतो. शासनावर कठोर टीका करणे हा लोकशाहीतील प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे; परंतु व्यक्तिगत अपमान, अश्लील भाषेचा वापर किंवा अवमानकारक वर्तनामुळे आंदोलनाची बाजू बळकट होत नाही. उलट, यामुळे आंदोलनाचे मूळ उद्दिष्ट मागे पडते आणि महत्त्वाच्या समस्यांवरून लोकांचे लक्ष विचलित होते. या संपूर्ण आंदोलनामागची पार्श्वभूमी अतिशय संवेदनशील होती. विद्यार्थ्यांचे अनिश्चित भविष्य, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि काही विद्यार्थ्यांच्या दुःखद घटनांचे संदर्भ यामागे जोडलेले होते. अशा अत्यंत संवेदनशील पार्श्वभूमीवर, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर काही कॉकरोचनी नृत्य करून जल्लोष केला. याची दृष्ये समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाली अन् त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. या आंदोलनाचे मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या वेदना, अश्रू आणि प्रश्न मांडणे असते, तर त्यांनी असा तमाशा केला नसता.
याहूनही अधिक धक्कादायक बाब म्हणजे, दिल्ली पोलिसांच्या सखोल तपासातून समोर आलेली सत्ये आहेत. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या बॅनरखाली केलेले आंदोलन हा केवळ विद्यार्थ्यांचा रोष नव्हता, तर त्यामागे एक सुनियोजित कट होता. पोलिसांनी ‘एआय-आधारित फेशियल रिकग्निशन सिस्टीम’ द्वारे केलेल्या तपासणीत उघड झाले की, आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो लोकांपैकी शेकडो जण हे हत्येचे आरोप, दरोडे, बलात्कार, अपहरण आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असलेले सराईत गुन्हेगार होते. या आंदोलनाच्या मंचावरून ज्या प्रकारे देशाच्या पंतप्रधानांबद्दल अत्यंत असंसदीय आणि अपमानास्पद भाषा वापरण्यात आली, ती अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशाच्या सर्वोच्च पदाचा अपमान करणे, हे कोणत्याही सुसंस्कृत समाजाचे लक्षण असू शकत नाही. यानिमित्ताने अशा भरकटलेल्या तरुणांच्या पालकांची जबाबदारीसुद्धा गांभीर्याने निश्चित करण्याची नितांत गरज आहे; कारण घरातून मिळालेले संस्कारच अशा आंदोलनांतून प्रतिबिंबित होत असतात.