सिंधुदुर्ग : गोवा-पणजीहून वेंगुर्ल्याकडे येणाऱ्या कदंबा वाहतूक महामंडळाच्या बसचा आजगाव-वाघबीळ येथील धोकादायक वळणावर भीषण अपघात झाला. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४५ प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले. बस ज्या ठिकाणी कलंडली, तेथून अवघ्या काही अंतरावर सुमारे २०० फूट खोल दरी असल्याने मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त होत आहे. (Bus Accident)
दुचाकीस्वाराला वाचवताना बस गटारात कलंडली :
गोवा-पणजी येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटलेली पणजी–शिरोडा–वेंगुर्ला (GA 03 X 0249) ही कदंबा बस आजगाव येथे पोहोचली असता समोरून एक चारचाकी वाहन येत होते. त्याचवेळी चारचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी बसचालकाने तत्काळ बस डाव्या बाजूला घेतली. या प्रयत्नात बसचा ताबा सुटला आणि ती रस्त्यालगतच्या गटारात कलंडली. (Bus Accident)
https://prahaar.in/2026/07/28/maharashtra-monsoon-update-rain-clouds-loom-over-maharashtra-again-a-yellow-alert-has-been-issued-for-19-districts-and-an-orange-alert-for-4-districts-today-heavy-downpours-are-forecast/
क्षणभराचा फरक आणि मोठा अनर्थ टळला :
अपघात ज्या ठिकाणी झाला ते वळण अत्यंत धोकादायक मानले जाते. बस आणखी काही फूट पुढे घसरली असती, तर ती थेट २०० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. मात्र चालकाने दाखवलेल्या धाडसामुळे आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली. (Bus Accident)
https://prahaar.in/2026/07/28/nagpur-crime-fraud-worth-%e2%82%b910-46-lakh-death-threats-and-sexual-assault-case-registered-against-two-individuals-in-nagpur/
ग्रामस्थांनी धाव घेत केली मदत :
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसचे चालक धनंजय आसोलकर आणि वाहक सर्वेश नाईक यांनी शांतपणे परिस्थिती हाताळत सर्व ४५ प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून सुरक्षित बाहेर काढले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे. (Bus Accident)