दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर भाष्य; संत तुकारामांच्या अभंगाचा संदर्भ देत या चर्चांना पूर्णविराम
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळेल, असे दावे विरोधकांकडून सातत्याने केले जात आहेत. त्यावर भाष्य करताना, मी महाराष्ट्रात समाधानी आहे, असे फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.(Devendra Fadnavis)
https://prahaar.in/2026/07/25/my-concern-for-the-residents-of-mumbai-and-pune-has-been-eased-dams-have-abundant-water-reserves-see-the-percentage-of-water-in-each-lake/
दिल्लीत जाण्याच्या सर्व चर्चा फेटाळून लावताना मुख्यमंत्र्यांनी ‘तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते पहावे, चित्त असू द्यावे समाधानी’ या ओळींचा संदर्भ दिला. “माझे चित्त पूर्णपणे समाधानी आहे. पांडुरंगाच्या आशीर्वादाने मला सहा वेळा आषाढी आणि दोन वेळा कार्तिकी एकादशीला पूजा करण्याचे भाग्य लाभले. राज्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून ही संधी मिळणे हा विठूरायाचाच प्रसाद आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या स्थितीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कर्जमाफी किंवा हमीभाव पुरेसा नसून उत्पादन खर्च कमी करणे हाच खरा उपाय आहे. शेतमालाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवत असल्याने आणि उत्पादन खर्च सातत्याने वाढत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. मोफत वीज, सूक्ष्म सिंचन, सौरपंप आणि कृषी यंत्रसामग्रीवर ९० ते १०० टक्के अनुदान दिले जात आहे. तसेच ‘महाविस्तार’ सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता (Ai) तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊन उत्पादन खर्च २५ टक्क्यांनी कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.(Pandharpur)
https://prahaar.in/2026/07/25/ashadhi-ekadashi-2026-every-mark-on-the-idol-of-lord-vitthal-tells-a-story-discover-the-hidden-spiritual-meanings/
पंढरपूर कॉरिडॉरचे काम लवकरच सुरू होणार
– पंढरपूर तीर्थक्षेत्र कॉरिडॉर प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ८० ते ९० टक्के स्थानिक नागरिकांच्या शंका निरसन करण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांशी संवाद साधून सर्वांना विश्वासात घेऊनच काम पुढे नेले जाईल. या प्रकल्पाचे महत्त्वाचे काम पुढील दोन ते अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन असून यामुळे विस्थापित होणाऱ्यांना योग्य पुनर्वसन करून प्रस्थापित केले जाईल, असा विश्वास त्यांनी दिला.
– दरम्यान, ठाकरे बंधूंच्या मोर्चावर बोलताना फडणवीस म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, ठाकरे बंधूंकडून काढल्या जाणाऱ्या मोर्चाचा विद्यार्थ्यांच्या हितसंबंधांशी काहीही संबंध नसून, आपल्या राजकीय पुनरागमनासाठीच हा आटापिटा सुरू असल्याचे दिसते.
– दिल्लीतील आंदोलनाबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, शांततेच्या मार्गाने मागण्या मांडणाऱ्या आंदोलकांचा आणि अराजकता माजवू पाहणाऱ्या राजकीय घटकांचा वेगळा विचार केला पाहिजे. केंद्र सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्याने आणि सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेत शांततेचे आवाहन केल्याने परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.