चित्रकूट : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) चित्रकूट (chitrakut) येथून अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेची (NEET) तयारी करणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर तीन अज्ञात नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. २२ जुलै रोजी बहिलपूरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवांगना विमानतळ परिसरातील जंगलात ही भयंकर घटना घडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, घटनेला ४८ तास उलटूनही आरोपी अद्याप मोकाट असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
‘वन विभाग कर्मचारी’ असल्याचं सांगून उकळले पैसे, मग केला अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी तिच्या १७ वर्षीय मित्रासोबत दुचाकीवरून देवांगना विमानतळाजवळील निसर्गरम्य परिसरात फिरण्यासाठी गेली होती. त्याच वेळी एका दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी त्यांना अडवले. आपण ‘वन विभागाचे कर्मचारी’ असल्याचे भासवून आरोपींनी त्या दोघांना धमकावण्यास सुरुवात केली आणि पैशांची मागणी केली. जेव्हा मुलगी आणि तिच्या मित्राने याला विरोध केला, तेव्हा नराधमांनी त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
https://prahaar.in/2026/07/25/nta-announces-senior-professional-posts-invites-young-professionals-through-upsc-pratibha-setu/
मित्राला ओलीस ठेवून अत्याचार
आरोपींची विकृती इथेच थांबली नाही. त्यांनी विद्यार्थिनीच्या मित्राचे हात-पाय बांधून त्याला ओलीस ठेवले. त्यानंतर दोन नराधम त्या विद्यार्थिनीला बळजबरीने जवळच असलेल्या घनदाट झुडपांमध्ये ओढत घेऊन गेले आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. या भयावह प्रसंगी विद्यार्थिनीने जीव वाचवण्यासाठी तीव्र प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी तिला अत्यंत अमानुषपणे मारहाण केली.
आरोपी CCTV कॅमेऱ्यात कैद
पीडित तरुणाने अत्यंत धैर्याने स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली आणि तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच तिन्ही आरोपी तिथून पसार झाले होते. पोलिसांनी परिसर पिंजून काढत मुख्य रस्त्यांवरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता, तिघे संशयित एका दुचाकीवरून वेगाने पळून जाताना स्पष्टपणे कैद झाले आहेत. सध्या पोलिसांचे सर्व्हिलन्स पथक या फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढत आहे.
३ जिल्ह्यांत पोलिसांची छापेमारी
या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी २ नामांकित संशयितांसह त्यांच्या साथीदारांवर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रयागराज झोनचे अप्पर पोलीस महासंचालक (ADG) ज्योती नारायण आणि चित्रकूटधाम रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) राजेश एस. यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली असून तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी चित्रकूट, बांदा आणि प्रयागराज या तीन जिल्ह्यांमधील पोलिसांची विशेष संयुक्त पथके ठिकठिकाणी छापे मारत आहेत.