Home ब्रेकिंग न्यूज NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

0
NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
nita ayog

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक

मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण, आर्थिक शिस्त आणि उद्योगांसाठीचे अनुकूल नियम यांचा आढावा घेणाऱ्या नीती आयोगाच्या ‘गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक २०२६’ मध्ये ५३.७ गुणांसह महाराष्ट्राने देशात दुसरे स्थान पटकावले आहे. गुजरातने ५६.६ गुणांसह राष्ट्रीय पातळीवर अव्वल क्रमांक पटकावला असून, तामिळनाडू ५३.३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. नीती आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या या अहवालात मोठ्या राज्यांच्या श्रेणीसह देशाच्या एकूण क्रमवारीतही महाराष्ट्राने आपली आघाडी सिद्ध केली आहे.(Maharashtra News)

https://prahaar.in/2026/07/21/ndrf-now-has-a-permanent-base-in-pune/

नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी यांच्या हस्ते जाहीर करण्यात आलेल्या या अहवालात देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांचे मूल्यमापन करण्यात आले. पायाभूत सुविधा, व्यावसायिक वातावरण, संसाधने, सरकारी धोरणे, नियामक सुलभता, संस्थात्मक वातावरण, आर्थिक आरोग्य आणि पर्यावरणीय लवचिकता अशा आठ निकषांवर हे मानांकन ठरवण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राने प्रामुख्याने ‘बिझनेस क्लायमेट'(Business climate) या निकषात देशात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. याशिवाय संसाधनांची उपलब्धता आणि राज्याची मजबूत आर्थिक स्थिती या श्रेणींमध्येही महाराष्ट्राची कामगिरी चमकदार राहिली आहे. तथापि, पायाभूत सुविधांचा विकास आणि नियामक सुलभतेमध्ये सुधारणेला वाव असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

https://prahaar.in/2026/07/21/star-pravah-new-serial-aishwarya-narkar-our-beloved-naik-bai-makes-a-comeback-to-star-pravah-after-eight-years-she-will-portray-the-role-of-a-dedicated-teacher-in-the-new-series/

या अहवालानुसार, अव्वल स्थानी असलेल्या गुजरातने पायाभूत सुविधा, वीज वितरण आणि बंदरांच्या कार्यक्षमतेच्या जोरावर अग्रस्थान पटकावले. मोठ्या राज्यांच्या यादीत ओडिशा चौथ्या, मध्य प्रदेश पाचव्या, तर आंध्र प्रदेश सहाव्या क्रमांकावर आहे; तर बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल ही राज्ये शेवटच्या स्थानी आहेत. ईशान्य व डोंगराळ राज्यांच्या श्रेणीत उत्तराखंडने प्रथम क्रमांक मिळवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य देशाच्या विकास प्रवासात सातत्याने नवनवीन शिखरे सर करत आहे. नीती आयोगाच्या या निर्देशांकातील दुसरे स्थान हे राज्यातील गुंतवणूक, आर्थिक, आरोग्य आणि औद्योगिक विकासाची साक्ष देते.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

https://prahaar.in/2026/07/21/pakistani-connection-of-a-fake-trust-in-beed-exposed-maharashtra-ats/

नीती आयोगाच्या ‘गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक २०२६’ मध्ये ५३.७ गुणांसह महाराष्ट्राने देशात दुसरे स्थान पटकावले, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्राला गुंतवणुकीसाठी देशातील आघाडीचे आणि विश्वासार्ह केंद्र बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व महाराष्ट्रवासियांचे मनःपूर्वक अभिनंदन.
नितेश राणे, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here