कृती आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; गडचिरोलीत नाट्य संकुल उभारणार
मुंबई : मराठी भाषा, साहित्य आणि विविध बोलींचे जतन तसेच संवर्धन करण्यासाठी एक सर्वसमावेशक व प्रभावी कृती आराखडा तयार करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. त्याचप्रमाणे, राज्य मराठी विकास संस्थेच्या दैनंदिन कामकाजात सातत्य, पारदर्शकता आणि गुणात्मकता आणण्याच्या दृष्टीने वर्षभरातील सर्व वैधानिक बैठकांचे वेळापत्रक आधीच निश्चित करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.(Mumbai News)
https://prahaar.in/2026/07/20/share-market-black-monday-black-monday-deals-a-massive-blow-to-the-stock-market-sensex-plunges-by-700-points-markets-across-india-and-the-globe-in-turmoil/
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या वेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, भाषा संचालक अरुण गीते यांच्यासह नियामक मंडळाचे अशासकीय सदस्य प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. राज्य मराठी विकास संस्थेने आपली सर्व वैधानिक अनुपालने यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे कौतुक केले. संस्थेचा गेल्या काही वर्षांतील प्रशासकीय व वैधानिक अनुशेष आता पूर्ण झाला असून, यामुळे प्रशासकीय चौकट अधिक बळकट झाली आहे. त्यामुळे आता केवळ कार्यालयीन कामकाजात न गुंतता मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, संशोधन आणि संवर्धनासाठी ठोस धोरणात्मक पावले उचलणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच संस्थेतील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नही सकारात्मकतेने सोडवले जातील, असे त्यांनी आश्वस्त केले.(Devendra Fadnavis)
https://prahaar.in/2026/07/20/an-opportunity-to-earn-a-whopping-%e2%82%b952000-for-spending-just-one-night-in-a-house-this-unusual-job-is-creating-quite-a-buzz/
या बैठकीत सदस्यांनी मराठी भाषा आणि विविध प्रादेशिक बोलींच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडले. यामध्ये ‘पुस्तकांचे गाव’ आणि ‘पेटी वाचनालय’ या उपक्रमांची व्याप्ती वाढवून आदिवासी व सीमावर्ती भागांतील मराठी शाळांपर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचवणे, झाडीबोली आणि पूर्व विदर्भातील समृद्ध नाट्यपरंपरेला राजाश्रय देण्यासाठी गडचिरोली-वडसा परिसरात हक्काचे नाट्य संकुल उभारणे, तसेच भारुड, गोंधळ, पोवाडा यांसारख्या पारंपरिक लोककलांच्या माध्यमातून मराठीचा सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवणे आणि बालसाहित्याला प्रोत्साहन देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. या सर्व सूचनांवर सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
https://prahaar.in/2026/07/20/central-railway-diva-station-cant-disembark-at-diva-dombivli-viral-message-regarding-15-coach-local-trains-is-false-central-railway-issues-major-clarification/
मोडी लिपीचे डिजिटायझेशन
– तंजावर येथील मोडी लिपीत असलेल्या सुमारे १५ लाख ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी या वेळी घेतला आणि या कामाला अधिक गती देण्याचे आदेश दिले. यासोबतच लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या जागतिक मराठी केंद्राच्या कामाचा आढावा घेऊन हा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याबाबत नियामक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.
– मराठी भाषेचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. जगभरात ७५ आंतरराष्ट्रीय बृहन्महाराष्ट्र मंच स्थापन करण्याची प्रक्रिया गतिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
– दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) कुसुमाग्रज यांच्या नावाने अध्यासन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय, विविध भारतीय व जागतिक भाषांतील दर्जेदार साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने एक विशेष ‘अनुवाद समिती’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.