पावसाच्या या शिडकाव्याने कोकणातील शेतकरी काहीसा सुखावला, म्हणजे भाताची ‘जीव जगवणी’ झाली असं त्याला वाटू लागलं. आणि परत पाऊस गायब झाल्याने विहिरीच्या, नदीच्या पाण्याने शेती शिंपून भाताची रोपे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न काही शेतकरी करत आहेत. गेले दोन दिवस पाऊस थोडावेळ हजेरी लावतो तर अनेक भागांमध्ये कडक उन्हामुळे शेतामध्ये भेगा पडल्या आहेत. परंतु पावसाच्या थोड्यावेळाच्या हजेरीने या शेतजमिनीला पडलेल्या भेगाही भरून निघतील, पण पाऊस पडायला हवा. कोकणातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असून कोकणात पावसाचा लपाछपीचा खेळ सुरू आहे.
https://prahaar.in/2026/07/20/ketan-agarwal-murder-case-another-video-from-ketan-and-siyas-engagement-goes-viral-ketan-was-moved-to-tears-by-siyas-words/
महाराष्ट्रात पूर्वी कोकण प्रांत भात पिकात अग्रेसर होता. शालेय पाठ्यपुस्तकात भुगोल शिकताना त्यामध्ये कोकणातील पिकांमध्ये भात अग्रस्थानी असल्याचे सांगितले जायचे. कोकणच्या जनतेच्या खाद्य पदार्थांमध्ये भात आणि मासे हे प्रमुख अन्न म्हटले जायचे. कोकणातील रायगड जिल्हा हा सर्वांधिक भात पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात, नाचणी पिके घेतली जात. गेल्याकाही वर्षांमध्ये शेतीचं स्वरूप बदलले. कोकणातील अनेक कुटुंब नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कोकण बाहेर नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई या शहरीभागात वास्तव्याला गेले. कोकणात कायमस्वरूपी रहाणाऱ्यांची संख्या फारच कमी झाली. यामुळे साहजिकच कोकणातील शेतीवर परिणाम झाला. भातशेती करायची तर किमान कुटुंबांतील चार-सहा शेतात काम करणारी माणसं हवीत. शेतात राबणारे हातच कमी झाले. नोकरी-व्यवसायात तरूण शहरांमध्ये गेले आणि थरथरत्या हातांची समाधानी मनाची वृद्ध माणसं गावात आहेत. परंतु त्यांची शेतात काम करण्याची क्रयशक्तीच उरलेली नाही. परिणामी कोकणातील भातशेतीचे क्षेत्र कमी झाले. अर्थात काहींनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती करण्याचा प्रयत्न केला. परंतु पूर्वीप्रमाणे पारंपरिक पद्धतीची शेतीची अवजारे आता दुर्मिळ होत चालली आहेत. जून महिन्याच्या ७ तारखेला मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाचे आगमन होत असे. सुरूवातीच्या काही दिवसांतच पाऊस असा काही बरसायचा की आता पाऊस थांबावा असं शेतकरी म्हणायचा. कोकणातील नदी-नाले, ओहोळ दुथडी भरून वाहायचे. मे महिन्याच्या रणरणता उन्हाळा संपून येणाऱ्या पहिल्या पावसात कोकण हिरवंगार होऊन जायचं. आंबा, काजू, रतांबा आदी फळ पिकांची जोडणी करणारा शेतकरी भात पेरणीसाठी सज्ज असायचा. पावसाचं आगमन कोकणातील शेतकऱ्याला खुणवायचं, भातशेती करणारा शेतकरी किमान वर्षभर कुटुंबाला भात पूरेल अशा पद्धतीने नियोजन करायचा. भात आणि माशांचं कालवण (आमटी) हे प्रमुख अन्न पदार्थ असल्याने भात भरपूर पिकलं की कोकणातील घराघरांत आनंदी वातावरण असायचे. पैशाची श्रीमंती फार नव्हती. कोकणातील शेतकऱ्याच्या गाठीला अधिकचा पैसा नव्हता. जेमतेम मुलांचं शिक्षण दोन वेळचं जेवण मिळतंय याचा कोण आनंद कोकणातील शेतकऱ्याच्या मनात असायचा.
https://prahaar.in/2026/07/20/sanjay-raut-is-trying-to-incite-the-youth-of-the-country-his-efforts-will-not-succeed-navnath-ban/
घरात वर्षभर खाऊनही भाताची कणगी, मुडी बांधलेली असायची. आता घरात कणगी भरलेलं भात आणि तसा शेतकरी शोधावा लागेल. भाताचा संचय करणारा शेतकरीही आता नाही. असलाच तर रायगड जिल्ह्यातील काही भागात असे शेतकरी असू शकतात. परंतु दक्षिण कोकणात मात्र आता भातशेतीचे क्षेत्र फारच कमी झाले आहे. काही कुटुंबात निष्ठेने, आवड म्हणून आणि कुटुंबाची कोकणची परंपरा म्हणून शेती केली जाते. अशा कुटुंब संस्था आजही एकत्र कुटुंबांचे दर्शन घडवत शेतात राबताना, आनंद घेताना दिसतात. सध्या ऋतुचक्रातील अनियमितता या शेतीच्या आड येऊ लागली आहे. यावर्षी जूनचा पहिला पंधरवडा देखील सुकाच गेला. अखेरीस पाऊस पडला तर पेरणी करावयाची की नाही अशा द्विधा मन:स्थितीत असताना थोडाफार पाऊस पडला त्याचा आधार घेत कोकणातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु काही दिवस पावसाने दडी मारल्याने भात पेरणी होऊन देखील भात चांगले उगवेल की नाही याची खात्री उरली नाही. यातच एप्रिल-मे महिन्यात जसा रणरणता उन्हाळा असतो त्यापेक्षाही अधिक उन्हाळा कोकणात जाणवू लागला होता. आता कुठे दोन तीन दिवस पडलेल्या पावसाच्या शिडकाव्याने कोकणातील शेतकरी काहीसा सुखावला, म्हणजे भाताची ‘जीव जगवणी’ झाली असं त्याला वाटू लागलं. अनेक भागांमध्ये कडक उन्हामुळे शेतामध्ये भेगा पडल्या आहेत. परंतु पावसाच्या थोड्या वेळाच्या हजेरीने या शेतजमिनीला पडलेल्या भेगाही जातील. कोकणातील शेतकरी संततधार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. सध्या कोकणात पावसाचा लपाछपीचा खेळ सुरू आहे. अशावेळी पूर्वी ‘ऊन आणि पाऊस कोल्याचा लगीन’ हे गंमतीच आवर्जून म्हटलं जायचं पण आता हे वाक्य उच्चारण्याची हिम्मतही कोकणातील शेतकऱ्यांमध्ये उरलेली नाही. वारंवार गायब होणारा पाऊस बरसावा याच प्रतिक्षेत कोकणातील शेतकरी आहे.