Home ब्रेकिंग न्यूज Devendra Fadnavis : सुमार कामगिरी करणाऱ्यांना मुख्यमंत्री देणार नारळ?

Devendra Fadnavis : सुमार कामगिरी करणाऱ्यांना मुख्यमंत्री देणार नारळ?

0
Devendra Fadnavis : सुमार कामगिरी करणाऱ्यांना मुख्यमंत्री देणार नारळ?

– मंत्रिमंडळात फेरबदलांचे संकेत; चांगले काम करणाऱ्या मंत्र्यांचे ‘प्रमोशन’

मुंबई : महायुती सरकारमध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या आणि सातत्याने वादात राहणाऱ्या अकार्यक्षम मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी सुरू केली असून, चांगली कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना ‘प्रमोशन’ मिळण्याची दाट शक्यता आहे. महायुतीमधील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांचा पत्ता कट होणार असल्याने सध्या सत्ताधारी गोटात हालचालींना वेग आला आहे. ( Maharashtra Cabinet Reshuffle)

https://prahaar.in/2026/07/15/icc-changes-the-format-of-the-odi-world-cup-now-includes-super-series-and-super-7-rounds/

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण झाल्यानंतरच राज्यातील या घडामोडींना गती येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. या फेरबदलात वादग्रस्त मंत्र्यांची गच्छंती होण्यासह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही मोठे फेरबदल केले जाऊ शकतात. दुसरीकडे, शिवसेनेच्या कोट्यातील कामगिरीत मागे पडलेल्या आणि सातत्याने वादात राहिलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवून त्यांच्या जागी नव्या आणि कार्यक्षम चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे आपापल्या अधिकारात आपापल्या पक्षातील मंत्र्यांच्या कामगिरीचा अंतिम आढावा घेऊन हा निर्णय घेणार आहेत. ( Maharashtra Politics)

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत वेगवान हालचाली पाहायला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे तातडीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’ बंगल्यावर दाखल झाले. या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांच्यात अत्यंत महत्त्वाची बैठक ( Cabinet Expansion) पार पडली असून, या बैठकीला ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. मंगळवारी रात्री ‘वर्षा’ बंगल्यावर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत झालेल्या विस्तृत चर्चेची आणि संभाव्य खातेबदलांची माहिती घेण्यासाठीच ही तातडीची बैठक बोलावण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  ( BJP Maharashtra)

https://prahaar.in/2026/07/15/central-government-approves-semicon-2-0-to-boost-chip-manufacturing/

वर्षा बंगल्यावर काय घडले?

दरम्यान, मंगळवारी रात्री ‘वर्षा’ बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील हे देखील उपस्थित असल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. मतदारसंघातील कामांसाठी ही भेट होती, असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले असले, तरी यामागे काही वेगळी राजकीय गणिते आहेत, याबाबतही चवीचवीने चर्चा रंगवल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here