मुंबई : मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात जुलैच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाने हजेरी लावली असली, तरी संपूर्ण राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. आता ८ जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, ही परिस्थिती किमान पुढील दहा दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Update)
राज्यातील अनेक भागांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला आहे. विशेषतः खानदेशातील धुळे आणि नंदुरबार, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि सोलापूर, तसेच पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Monsoon Update)
https://prahaar.in/2026/07/07/nashik-water-level-of-godavari-also-increased/
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ८ जुलैनंतर राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील. या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असून, अनेक ठिकाणी कमाल तापमानातही वाढ होऊ शकते. त्यामुळे वातावरणात उष्णता आणि दमटपणा वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातही पावसाचे प्रमाण पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत अत्यल्प राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा आणखी वाढू शकते. (Maharashtra Monsoon Update)
https://prahaar.in/2026/07/07/ahilyanagar-300-mm-of-rain-in-24-hours/
या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. ज्या भागांमध्ये अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही, तेथील शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीचे नियोजन करावे आणि पुढील पावसाची स्थिती पाहूनच कृषी कामांना गती द्यावी, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. (Maharashtra Monsoon Update)
दरम्यान, मान्सूनचा वेग तात्पुरता मंदावणार असला तरी पुढील काही दिवस हवामानातील बदलांवर सतत लक्ष ठेवण्याचे आवाहन हवामान तज्ज्ञांनी केले आहे.