मुंबई : राज्यातील मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. भूस्खलन, रस्त्यावरून वाहणारे पाणी आणि इतर धोकादायक परिस्थितीमुळे दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’ आणि ‘मिसिंग लिंक’ दरम्यान काँक्रीटचा खांब कोसळल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. (Pune Mumbai Expressway)
https://prahaar.in/2026/07/06/citizens-in-dombivli-distressed-by-heavy-rains-daily-life-disrupted-due-to-waterlogging-fear-caused-by-a-gang-of-thieves/
दरम्यान, मावळ आणि ताम्हिणी घाट परिसरातही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातून मुंबईकडे जाणारे काही पर्यायी मार्गदेखील पाण्याखाली गेल्याने ते वापरणे धोकादायक ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारण नसल्यास पुणे आणि मुंबईदरम्यानचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत प्रवास पुढे ढकलावा आणि वाहतूक विभाग व स्थानिक प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणा घटनास्थळी कार्यरत असून रस्त्यांवरील अडथळे दूर करण्याचे काम सुरू आहे. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.
https://prahaar.in/2026/07/05/five-members-of-the-same-family-missing-did-they-run-away-or-was-there-foul-play-what-exactly-happened/
प्रशासनाने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माध्यमांद्वारे मिळणाऱ्या अद्ययावत माहितीनुसारच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.