Home ब्रेकिंग न्यूज HSRP Registration Plate : राज्यात केवळ ४९ टक्के वाहनांवर ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट

HSRP Registration Plate : राज्यात केवळ ४९ टक्के वाहनांवर ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट

0
HSRP Registration Plate : राज्यात केवळ ४९ टक्के वाहनांवर ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट

– उद्यापासून १ हजार रुपये दंड; मुदतवाढ मिळणार नसल्याचे परिवहन मंत्र्यांकडून स्पष्ट

मुंबई : राज्यातील जुन्या वाहनांवर ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) बसवण्यासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत आज, ३० जून रोजी संपत असून, उद्यापासून (१ जुलै २०२६) विनानंबर प्लेट धावणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. “वाहनधारकांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, आता कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. ज्या वाहनांवर ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट नसेल, त्यांच्यावर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून मोटर वाहन कायद्यानुसार १ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल,” अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, राज्यात अद्याप जवळपास ५१ टक्क्यांहून अधिक वाहनांवर ही नंबर प्लेट प्रत्यक्ष बसवण्याचे काम अपूर्ण असल्याने उद्यापासून वाहनधारकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. (HSRP Registration Plate)

परिवहन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘एचएसआरपी’ अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. राज्यातील सन २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या एकूण २ कोटी १० लाख २७ हजार ७१८ जुन्या वाहनांपैकी १ कोटी ८ लाख २८ हजार ७९९ वाहनधारकांनी (५१.५०%) या नंबर प्लेटसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. मात्र, त्यापैकी प्रत्यक्षात केवळ ९५ लाख ९२ हजार ३०१ वाहनांवर (जवळपास ४९ टक्के सक्रिय वाहने) ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट प्रत्यक्ष बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. अद्यापही निम्म्याहून अधिक वाहनांवर ही सुरक्षित नंबर प्लेट बसवणे बाकी आहे. (HSRP Registration Plate)

https://prahaar.in/2026/06/30/sachin-ahir-to-file-nomination-for-deputy-chairman-post-on-behalf-of-shiv-sena/

सर्वसामान्यांच्या वाहनांची प्रक्रिया संथ गतीने सुरू असली, तरी सरकारी आणि निमशासकीय वाहनांच्या बाबतीत परिवहन विभागाने बाजी मारली आहे. राज्यातील एकूण ४७ हजार २३३ सरकारी वाहनांपैकी मे २०२६ अखेर तब्बल ४७ हजार ६७ वाहनांवर ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट यशस्वीरीत्या बसवण्यात आली आहे. शासकीय पातळीवर या मोहिमेची जवळपास १०० टक्के अंमलबजावणी पूर्ण झाली असून, आता खासगी वाहनांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. (HSRP Registration Plate)

अशी होणार कारवाई :

१ जुलैपासून सुरू होणाऱ्या मोहिमेसाठी परिवहन विभागाने विशेष ‘प्रमाणित कार्यपद्धती’ (एसओपी) जारी केली असून सर्व प्रादेशिक (आरटीओ) व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना तपासणीचे आदेश दिले आहेत. आरटीओ आणि ट्रॅफिक पोलीस संयुक्त किंवा स्वतंत्रपणे रस्त्यावर उतरून वाहनांची तपासणी करतील आणि नियम मोडणाऱ्यांवर १ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करतील. या मोहिमेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभरात व्यापक जनजागृती आणि वाहन संघटनांसोबत बैठकाही घेण्यात आल्या होत्या. तसेच नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी स्वतंत्र ई-मेल सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. (HSRP Registration Plate)

https://prahaar.in/2026/06/30/major-revelation-in-the-nashik-mhada-scam/

फायदा काय?

‘एचएसआरपी’ नंबर प्लेटमुळे बनावट नंबर प्लेट वापरून होणाऱ्या गुन्ह्यांना पूर्णपणे आळा बसेल. यामुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित होईल, वाहन चोरीच्या घटना कमी होतील आणि पोलिसांना गुन्ह्यांच्या तपासात मोठी मदत होऊन एकूण वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता येईल. त्यामुळे वाहनधारकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी तातडीने ही नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (HSRP Registration Plate)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here