असा ऋतू

0
असा ऋतू

गड-किल्ले हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण. शाळेत असताना पहिल्यांदा पहिला गड पाहिला तो ‘रायगड’ तोही सहलीच्या निमित्ताने! त्याच्यानंतर अनेक किल्ले पाहिले. अगदी अलीकडेच प्रतापगड पाहिला. लोहगड किल्ल्यावर अजून तरी जाण्याची संधी चालून आली नव्हती, पण तो किल्ला गेले चार दिवस खूप जवळून पाहत आहे. इतका सुंदर निसर्गरम्य गड आणि त्याच्यावर फिरायला गेलेली आनंदात बागडत असणारी कितीतरी माणसे या फोटोंमधून दिसत आहेत; परंतु लोहगड किल्ल्यावर घडलेल्या वाईट घटनेमुळे तो सातत्याने डोळ्यांसमोर येतोय. एक संवेदनशील माणूस म्हणून त्यावर काहीच प्रतिक्रिया न देणे, मनाला अजिबात पटत नाहीये कारण तीन दिवस झाले मी झोपू शकले नाही. पंचविशीच्या आत-बाहेरची तरुण माणसे नेमके काय करण्यासाठी लोहगडावर गेले होते ते पाहून फार वाईट वाटले. आत्तापर्यंत कधीच माहीत नसलेला आणि कधीच माहीत होणार नसलेला तरुण गोड मुलगा केतन सातत्याने डोळ्यांसमोर येत आहे. कोणाचे तरी हे गोड लेकरू आता फोटोत गेले आहे. त्याला फोटोत पाठवणारी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची होणारी बायको आहे, ही गोष्ट मनाला अतिव वेदना देणारी आहे, त्या मुलीचे नाव ‘सिया.’

‘सिया’ म्हणजे देवी सीता, होय, प्रभू रामचंद्राची पत्नी किंवा राणी. संस्कृत भाषेत ‘सिया’ शब्दाचा अर्थ म्हणजे मोहक, दैवी किंवा अतिसुंदर. एकीकडे आत्तापर्यंत आपण सियारामचंद्र की जय!, ऐकत आलोय; जिने जनमाणसांसमोर आपण पतिव्रता असल्याचे सिद्ध करण्यासाठी धरतीमायला आपल्याला गर्भात घेण्याची विनंती केली आणि ती म्हणे त्या काळात मान्यही झाली! आजची आधुनिक सिया आपल्या होणाऱ्या पतीला मातीत गाढून आली. यासाठी स्वतःच्या मित्राचा वापर करून घेतला त्याचे नाव चेतन. इतक्या लहान वयात इतकी क्रूरता माणसांमध्ये कुठून येते? का येते? काळ झपाट्याने पुढे जातोय. इथे जात-धर्म-देश या पलीकडे जाऊन सहज लग्न केली जातात. ती लग्न टिकवलीही जातात. या पार्श्वभूमीवर सियाने केतनच्या स्थळाला व्यवस्थित नकार देऊन चेतनबरोबर संसार थाटायला काहीच हरकत नव्हती. ‘मला चेतन बरोबर राहायचे आहे. त्याच्याबरोबर संसार करायचे आहे’, असे जर तिने दोन्ही कुटुंबातील कोणाहीकडे व्यवस्थित सांगितले असते, तर कदाचित आज ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली नसती. जर तिच्या घरातून विरोध होत असेल तर कमीत कमी केतन किंवा केतनच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन हे लग्न मोडायला लावायला हवे होते. एका निष्पाप जीवाला आयुष्यातून उठवायचा अधिकार कोणालाच दिलेला नाहीये.

आजच्या तरुणांपुढे खूप प्रश्न आहेत, शिक्षण, आर्थिक विवंचना, कोणत्याही क्षेत्रात टिकून राहण्याची स्पर्धा तसेच आणखी कितीतरी. अशा परिस्थितीत स्वतःला संपवणे किंवा आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला संपवणे, चुकीचे आहे; हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची फार मोठी गरज निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांपासून ते कोणत्याही वयाच्या माणसांपर्यंत आजच्या काळात मानसिक स्थैर्य निकोप ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर, वेगवेगळे प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रचंड अस्वस्थतेतून मी हा लेख लिहीत आहे.हाच लेख जेव्हा छापून येईल तेव्हा कदाचित या चेतन, केतन आणि सिया कथेमध्ये काही टर्न अँड ट्विस्ट येतील. वेगवेगळ्या घटना, वेगवेगळ्या माणसांच्या मुलाखती, त्यांच्या फोनमधील डेटावरून वेगळीच माहिती समोर येईल; परंतु सर्व प्रकारे आपण सत्यापर्यंत पोहोचलो तरी एक सत्य कायमस्वरूपी प्रत्येकाला अस्वस्थ करत राहील, ते एका निष्पाप तरुणाचं अशा तऱ्हेने स्वर्गवासी होणं!लोहगड हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला आहे जो पर्यटकांना जेवढा आकर्षित करतो तितकाच गिर्यारोहकांना. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ऐतिहासिक संपत्ती आणि खजिना साठवण्यासाठी या किल्ल्याची खास योजना केली होती. या किल्ल्याचा इतिहास असा की सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव या राज्यवटींचा येथे अंमल होता. शिवाजी महाराजांनी १६४८ मध्ये हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला होता. इतिहासात फार खोल जायला नको. या किल्ल्याचा चढ तसा अवघड अजिबात नाही आहे म्हणजे तास-दीड तासांत सामान्य माणूसही चढून वर जाऊ शकतो. इथे तर केतन उत्तम गिर्यारोहक होता अशी माहिती त्याच्याविषयी वाचली आहे, म्हणजे तो पडण्यासारखा निश्चित नव्हता. भारत सरकारने २६ मे १९०९ रोजी या गडाला ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा महत्त्वाच्या गड-किल्ल्यांच्या यादीत ‘लोहगड’चा समावेश आहे. त्याला युनेस्को (UNESCO) जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे.

एखाद्या गडकिल्ल्याची ओळख ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ अशी आहे ती तशीच राहावी असे वाटते. आता सिया, चेतन किंवा आणखी कोणाला, कोणती शिक्षा होईल, कोण किती काळासाठी जेलमध्ये जाईल, कोणाला फाशी होईल; या सगळ्या गोष्टी न्यायालयात घडतील. कदाचित तो न्याय योग्यही असेल; परंतु ज्या आई-वडिलांनी आपले अपत्य गमावले आहे, त्यांचे काय? केतनच्या आयुष्यातील सप्तरंगांचे काय? आपण हा लेख वाचाल तेव्हा पावसाळा सुरू झालेला असेल! कोणाच्या तरी मनात तरीही प्रचंड काळोख दाटलेला असेल. ‘नेमेचि येतो पावसाळा!’ असे म्हणत आपण सर्व ही घटना विसरून जाऊ फक्त तोपर्यंत, जोपर्यंत अशा स्वरूपाची नवीन घटना घडत नाही. तेव्हा काय? पावसाने जशी झाडे स्वच्छ होतात, वातावरणातील प्रदूषण कमी होते. जगभरातील माणसांची मने स्वच्छ होतील, असा पावसाळा कधी येईल? अशा ऋतूची निर्मिती विश्वनिर्माता करेल काय?
pratibha.saraph@
gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here