Home साप्ताहिक कोलाज विश्वासघात

विश्वासघात

0
विश्वासघात

संस्कृतीचा गोडवा-पूर्णिमा शिंदे

पुण्यातील कर्वेनगर येथे स्थायिक असलेले संध्या आणि विनोद शहा हे व्यापारी असतात. त्यांचा उद्योग व्यवसाय व्यवस्थित सुरू असतो. त्यांच्या घरी एक पुत्र जन्माला येतो. कोडकौतुकाने त्याचे नाव रोहन ठेवण्यात येते.रोहन हळूहळू मोठा होऊ लागतो. त्यानंतर त्यांना निशा नावाची कन्या होते. दोन मुलं झाल्यानंतर आई-वडील स्वत:ला या दोन मुलांमध्ये, त्यांचे लाडकोड, कौतुक, संगोपन, शिक्षण पालनपोषण करण्यामध्ये वाहून घेतात. हळूहळू मुले मोठी होऊ लागतात. शाळेत जातात. कॉलेजला जातात. पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होऊन मुलं व्यवसायात हातभार लावू लागतात.आता मुलं मोठी झाली. लग्नाला आली म्हणून त्यांच्या लग्नाची बोलणी होऊ लागतात. अनेक नातेवाईक त्यांच्यासाठी चांगली चांगली स्थळे घेऊन येतात. खूप चांगली स्थळं चालून येतात. हळूहळू सर्वांनाच वाटू लागतं, की चांगलं घराणं आहे. चांगली मुलं आहेत. दरम्यान रोहनला एक नामांकित घराण्यातलं स्थळ येतं.

कमल आणि विवेक दलाल यांच्या कुटुंबातील रिया नावाच्या मुलीचं. समाजातील नातेवाईक सर्वजण एकत्र येऊन िरयाचं स्थळ पुण्यातील संध्या आणि विनोद यांच्याकडे दाखवतात. एकमेकांची पसंती होते. मुला-मुलींची पसंती झाल्यानंतर आपसात गप्पागोष्टी होतात. दोघांची मतं जाणून घेतली जातात. दोघांची पसंती होते. लग्नाची बोलणी सुरू होतात. दोघे रोज एकमेकांना कॉल करू लागतात. भेटू लागतात. दिवसेंदिवस फोन वाढू लागतात. फोनवर चांगले बोलत असतात. दोन्ही घरची लाडकी मुलं एकत्र फिरायलाही जाऊ लागली.चार-सहा महिन्यांत लग्नाची बोलणी पक्की झाली. साखरपुडा करून घेतला. यासाठी सर्व खर्च मुलाचाच होता. मुलाच्याच मंडळीने भार उचलल्यामुळे रोहनने रियाच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. हवी ती गोष्ट तिला दिली होती. सर्व यथोचित झाले. आनंदाने सगळा सोहळा संपन्न झाला.मग आता रियाचा वाढदिवस असतो. रियाचा हट्ट वाढदिवसाला बालीसाठी जायचे. म्हणून रोहनने इंडोनेशियाला जाण्याचा प्लॅन केला. सर्वांचे पासपोर्ट काढण्याची तयारी सुरू झाली. पासपोर्ट निघाले. तारीख ठरली आणि विमानतळावर जाणार तितक्यात काही कारणास्तव ते लोणावळ्यामध्ये उतरले असताना प्रिया म्हणते गाडीत माझा फोन विसरला आहे. तो आणण्यासाठी ती पुन्हा मागे जाते आणि त्यात रोहनचा पासपोर्ट फाडून टाकते. यामध्ये चार पासपोर्ट असतात. रोहनची बहीण, रोहन, रियाचा भाऊ आणि रिया या चार पैकी फक्त रोहनचा पासपोर्ट फाडून नष्ट केला जातो. आता त्यांचे जाणे काही होत नाही. मग हे पुन्हा घरी निघून जातात आणि घरी गेल्यानंतर ती रोहनला म्हणते, आपण लोहगडला फिरायला जाऊया. आता लोहगडला फिरायला जायचा दिवस ठरतो. रियाचा वाढदिवस असतो त्या दिवशी रिया म्हणते आपण दोघेच जाऊ. रोहन आणि रिया सकाळी जायला निघतात. गाडीने लोहगडला गेल्यावर ती मागेपुढे जाऊन सारखी फोनवर मेसेज किंवा फोन करत असते. वरती जाऊन रेंज नसल्यामुळे त्यांच्या मागे एक हुडी घातलेला मुलगा अवतीभवती फिरत असतो. गॉगल लावून कोणालाही ओळखता येणार नाही. अशा पद्धतीने रोहन सेल्फी काढण्यासाठी रियाला जवळ बोलावतो. ती मागून येण्याचे नाटक करते आणि रोहनला धक्का देऊन ३५० फूट खोल दरीत ढकलून देते. हे सगळं ती तिच्या प्रियकराच्या साहाय्याने करते. हे असे केल्यानंतर ती घरी निघून जाते. तो पाय घसरून दरीत पडला, असं सगळ्यांना सांगते. सेल्फीच्या नादात होता त्याचा पाय घसरला. तो पडला. पण तो एक चांगला सराईत गिर्यारोहक ट्रेकिंग करणारा मुलगा असतो. रोहन नेहमीच वरचेवर लोहगडला जायचा. पण त्याचा कधी पाय घसरला नाही. या दोघांनी त्याला ढकलले. तिथे प्रेत मिळते. पोलीस त्या जागी सर्व तपासणी करतात. आणि त्यांना संशयास्पद मृत्यू आढळून येतो. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले जाते. रोहनचे प्रेत आई-वडिलांच्या समोर गेल्यानंतरही रियाचा काहीच प्रतिसाद नसतो किंवा प्रतिक्रिया नसते. तिच्याबरोबर असलेला तिचा प्रियकर आकाश चव्हाण हा यात सामील असतो आणि हे सगळे कॅमेरामध्ये नमूद होते. निर्दयी निष्ठुर रियाला २४ वर्षीय रोहनच्या जीवाशी, भावनांशी खेळताना एकदाही माणूसपणाची आठवण झाली नाही का? त्याचे आई-वडील वेडेपिसे झाले… कोसळले.

आपले पोटचे मूल गेल्याचे कळताच कासावीस झाले. दोन दिवसांत पोलिसांनी मात्र या संशयावरून सगळे धागेदोरे शोधून काढले. पण प्रश्न इथेच संपतो का तर नाही. इथे सुरू होतो लग्न एक पवित्र नातं, दोन मनांचं, दोन कुटुंबाचं, ऋणानुबंधांचं! एखाद्यावर नसेल प्रेम तर लग्न करू नका. पण नाही बोलायला शिका, आपले मत व्यक्त करा. कोणाच्याही जीवाशी, भावनांशी खेळू नका! तुम्हाला कोणी दिला हक्क? जर आपण एखाद्याचे चांगलं करत नाही तर वाईट करण्याचा गुन्हा का करता? रियासाठी १४ करोडचा महाल, समारंभासाठी दोन विमाने बुक करणारा रोहन बिचारा… दुर्दैवी रोहनला काय माहीत? की आपण एका राक्षसी वृत्तीच्या मुलीबरोबर आहोत आणि ती आपल्याआयुष्याचा गेम करणार. आपल्या पाठीत खंजीर खुपसला जाणार! लग्न संस्था ही अशी संस्था आहे की समाज, संस्कृती, मूल्य, नैतिकता येथे पाळली जाते आणि म्हणूनच समाज त्यावर टिकून आहे. पण आज समाजात अशा राक्षसी क्रूर, नीच मुलींना कोण सांगेल? त्यांना चाड आहे का, लाज आहे का? ज्याचं जळतं त्याला कळतं! आपण त्याचे सांत्वन कोणत्या शब्दांनी करणार? त्या दुःखाचे सांत्वन कसे करणार आहोत. कारण रिया आता समाजातून उठली. आयुष्यातून, कुटुंबातून उठली. तुरुंगवास होणारच. शिक्षाही होईल. पण त्या आई-वडिलांच्या म्हातारपणाचा आधार परत येणार आहे का? मुलींनो खरं बोला. खरं सांगा. कोणाशीही असं वागू नका. इतके मतलबी होऊ नका. जर असे वागलात तर त्याच्या आई-वडिलांचा शाप आणि तळतळाट नक्कीच तुम्हाला भोवणार. तुम्ही कधीच सुखी होऊ शकत नाही. एखाद्याला इतकं दुःख देऊन, पुढील संचित प्रारब्ध घेऊन तो सूड तुमच्या सात जन्मामध्ये अशाच राहणार आहे. त्यामुळे कृपाकरून मुलींनो लग्न संस्था वाचवा. कळकळीची विनंती. आता इतक्यात ही या महिन्यातली तिसरी घटना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here