Home साप्ताहिक कोलाज ‘तुम आओ तो सही…’

‘तुम आओ तो सही…’

0
‘तुम आओ तो सही…’

नॉस्टॅल्जिया-श्रीनिवास बेलसरे

सिनेमातील प्रेमगीते आणि गैरफिल्मी गझला यात एक फरक असतो. सिनेमातील गाणी एखाद्या प्रसंगासाठी लिहिलेली असतात. अनेकदा, असे पूर्ण गाणे हे कुणाला तरी उद्देशून केलेले काव्यात्मक निवेदन असते. सिनेमातील पात्राच्या जीवनात घडलेल्या प्रसंगावर केलेली तक्रार, विनवणी किंवा काही वेळा त्या पात्राचे स्वगत असते. कधीकधी गझलच्या आशयाचे याच्याशी साम्य असले तरी दोघांत एक मोठा फरक असतो.सिनेगीत हा त्या क्षणाचा संवाद असतो, तर गझलेला वेळेचे, प्रसंगाचे बंधन नसते. एका अर्थाने गझल कालातीत असते. ती त्या प्रसंगाला, त्या क्षणालाही लागू पडते आणि इतर अनेकांनाही त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगात आपलीशी वाटू शकते. ती म्हणजे एका मनस्वी कवीने मांडलेले सार्वत्रिक दु:ख, वेदना आणि चिंतन असते. कवीच्या संवेदनशील हळव्या मनाने केलेले मानवी समाजाचे एखादे मर्मभेदी निरीक्षण गझलेत नोंदवलेले असते. म्हणून गझल नेहमी दीर्घायु असते.‘मेरे सपनोकी रानी कब आयेगी तू?’ हे ‘आराधना’(१९६९)मधले गाणे राजेश खन्नाने शर्मिला टागोरला उद्देशून गायलेले लोकप्रिय प्रेमगीत आहे. प्रेयसीच्या आगमनाची उत्कटपणे पाहिलेली वाट, तिची ओढ आणि तिला बोलावण्याचा आग्रह हा या गाण्याचा विषय! पण एकदा त्यांची भेट झाली की या गाण्याचे आयुष्य संपले. कारण ती आली, आता ‘ती केव्हा येणार?’ हा प्रश्नच शिल्लक राहिला नाही!

याउलट बहादूरशहा जफर यांची प्रसिद्ध गझल पाहा –
‘ना किसीकी आंखका नूर हुं,
ना किसीके दिलका करार हुं,
जो किसीके काम ना आ सके,
वो मैं एक मुश्त-ए-गुबार हुं’

ही गझल एकटेपणा, कुणीतरी जीवलग भेटण्याची अव्यक्त पण अनावर ओढ, आशा, तसे आयुष्यात कुणीच नसल्याने आलेली टोकाची निराशा व्यक्त करणारे काव्य आहे. पण या रचनेला काळाचे किंवा कुणा एका व्यक्तीच्या भेटीचे बंधन नाही. एकटेपणा असह्य झालेल्या कुणालाही ती आपली वाटू शकते. वाटतेच! (ही गझल शेवटचे मुगल सम्राट बहादूरशहा जफर यांच्या नावावर नोंदवली गेली असली तरी ती आपले आजोबा मुज़्तर ख़ैराबादी यांची आहे असे गीतकार जावेद अख्तर यांचे म्हणणे आहे.)
गझलांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यातले निवेदन अतिशय अदबीने, अजीजीने प्रेयसीपुढे, आपल्या जीवलगापुढे केलेले आर्जव असते. ती अजीजीची विनंती असली तर बरीच अप्रत्यक्ष असते. आपले हितगुज शब्दातून मोठ्या डौलाने, सर्व शिष्टाचार पाळत फक्त ध्वनित केलेले असते. शब्द, भाषा, प्रतीके, प्रतिमा इतक्या भावुक आणि मनस्वी असतात की समोरच्या व्यक्तीचे हृदय हललेच पाहिजे.भारतीय उपखंडात असे अगणित मनस्वी शायर होऊन गेले. त्यांच्या रचना कितीतरी पिढ्यांना दिलासा देऊन गेल्या, कितीतरी

निराश मनांना, जीवनातला पराभव पचवण्याचे बळ या कवींनी दिले. शब्दांच्या प्रेमात पडलेल्या या शब्दप्रभूंनी कितीतरी तरुणांना प्रेमातील अनुनय, अनुराग, हळवेपणा, संयम शिकवला.असेच एक फाळणीपूर्व सिंधमधले शायर होते मुमताज मिर्झा. त्यांचे मूळ नाव तवस्सूल हुसैन. सिंधी संस्कृती आणि साहित्याचे पाकिस्तानी अभ्यासक! त्यांनी पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन आणि पाकिस्तान टेलिव्हिजन कॉर्पोरेशनसाठी बरीच वर्षे काम केले. त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल पाकिस्तान सरकारने त्यांना प्रतिष्ठित ‘प्राईड ऑफ परफॉर्मस’ पुरस्काराने गौरविले होते. सिंध प्रांतातील राज्य सरकारने मिर्झासाहेबांच्या गौरवार्थ हैदराबाद येथील एका नाट्यगृहाला त्यांचे नाव दिले आहे.चित्रा सिंग यांनी मुमताज मिर्झांची एक अगदी साधी शब्दरचना असलेली मनस्वी मुडची गझल इतक्या समरसतेने गायली आहे, की आपण गोंधळात पडतो. ती मूळ शायरी छान आहे. चित्राजींनी मुद्दाम लावलेला लाडीक आवाज रसिकांच्या मनाला स्पर्शून, सुखावून जातो ते शेवटपर्यंत कळत नाही. मात्र कुणाही रसिकाला हुकमी रोमँटिक मूडमध्ये घेऊन जाणारी ही कविता तशी अनेकांनी गायली आहे. पण ती चित्राजींच्याच आवाजात ऐकायला हवी. कारण उर्दू शायरीतील आर्जव, लाघवीपण म्हणजे काय असते ते त्यांच्या गायकीतच कळते.

प्रेयसी प्रियकराला विनवते आहे आणि तो संकोच करतोय. ती त्याला खात्री देते ‘मी आपल्या प्रेमाची गोष्ट जगाला कळूच देणार नाही. तू इकडे ये तर खरी!’ ती म्हणते, ‘माझ्यासाठी तू इतका अनमोल खजिना आहेस की मी तुला सगळ्या जगापासून लपवून
ठेवणार आहे.’ –
‘तुमको हम दिलमें बसा लेंगे,
तुम आओ तो सही…
सारी दुनियासे छुपा लेंगे,
तुम आओ तो सही…’

अजून तो आलाही नाही, तर तिला त्याच्याकडून आयुष्यभराच्या साथीचे वचन हवे आहे. पण पहिल्या प्रेमात तर तसेच असते ना? आता दोघांनी कायमचे एकत्र राहायचे, प्रेमाचे नाते जन्मभर निभवायचे वचन एकमेकाला द्यावे हाच तर आग्रह असतो प्रेमिकांचा! मग त्यासाठी ‘मी तू म्हणशील ते करीन.’ असे आश्वासन प्रियकर प्रेयसीला आणि तीही त्याला देतच असते ना? –

‘एक वादा करो,
अब हमसे न बिछड़ोगे कभी
नाज़ हम सारे उठा लेंगे,
तुम आओ तो सही.’

प्रेमाच्या जुनूनमध्ये मग प्रेमिक आपल्या जीवलग व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतात. त्याची/तिची कितीही गंभीर चूक क्षम्य मानतात. प्रेम इतके अनावर होते की मग सगळे जगच काय अगदी मूलभूत श्रद्धाही सोडून द्यायला तयार होतात. ‘तू अप्रामाणिक असशील, कठोर असशील, तुला इतरांवर नेहमी जुलूमच करायची सवय असेल तरी मला चालेल. मी तुला माझ्या मनात देवाचेच स्थान देईन. माझे प्रेम अगदी निरपेक्ष असेल, तुझ्यासाठी माझी कोणतीही अट नाही. पण तू एकदा ये तर खरी!
‘बे-वफ़ा भी हो, सितमगर भी,
जफ़ा-पेशा भी,
हम ख़ुदा तुमको बना लेंगे,
तुम आओ तो सही.’

‘जीवनात अनेक अडचणी येतील, हे मला मान्य आहे. आपल्या प्रेमाचा मार्ग अंधारलेला, लांबच लांब आणि कितीही अवघड असला तरी तू काळजी करू नकोस. मी माझ्या दु:खाचाच दिवा पेटवून ठेवेन आणि आपण सुखात मार्गकर्मणा करू. पण तू ये तर खरी –
‘राह तारीक है और दूर है मंज़िल लेकिन,
दर्दकी शमएँ जला लेंगे
तुम आओ तो सही…’
मनस्वीपणा, आर्जव आणि प्रेमातील बेधुंद उन्माद अर्थात ‘जुनून’ अनुभवायचा असेल तर उर्दू शायरीला पर्याय नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here