Home साप्ताहिक कोलाज वटपौर्णिमा परंपरा, निसर्गसंवर्धन आणि स्त्रीशक्तीचा उत्सव

वटपौर्णिमा परंपरा, निसर्गसंवर्धन आणि स्त्रीशक्तीचा उत्सव

0
वटपौर्णिमा परंपरा, निसर्गसंवर्धन आणि स्त्रीशक्तीचा उत्सव

स्मृतीगंध-लता गुठे

भारतीय संस्कृतीमध्ये व्रतवैकल्यांना विशेष महत्त्व आहे. या व्रतवैकल्याच्यामागे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि निसर्ग अशी अनेक मूल्ये सामावलेली आहेत. यापैकीच महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या वृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात.मला नेहमी एक प्रश्न पडत आला आहे, आपल्या संस्कृतीमध्ये व्रत, उपवास स्त्रियांसाठीच का आहेत? याचे उत्तर असे असावे कदाचित, स्त्री ही निसर्गाशी जास्त जोडली गेली आहे. ती सृजनशील, सर्जनशील आणि नवनिर्मितीचा स्त्रोत आहे. ज्या स्त्रीने शेतीचा शोध लावला तिच्यामध्ये संवर्धन करण्याची वृत्ती आणि प्रेरणाही होती. निसर्गाचे वृक्षाचे संवर्धन व्हावे म्हणून त्या पाठीमागे आपल्या धर्मग्रंथांमध्ये, पोथी पुराणांमध्ये व्रतवैकल्य जोडली. यानिमित्ताने निसर्गाचे रक्षण होईल आणि मानवाला सुख-समाधान मिळेल. तसेच वटपौर्णिमेचे महत्त्व वाढण्यासाठी सत्यवान सावित्रीची कथा पुराणांमध्ये लिहिली गेली असेल. वडाचा वृक्ष ऑक्सिजन भरपूर देतो. सत्यवानाला वडाच्या झाडाखाली झोपविल्यामुळे ऑक्सिजन भरपूर मिळाला असेल आणि त्याचे प्राण वाचले असतील.

परंतु आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचा उत्सव होतो आणि त्या मागचे खरे कारण कोणीही विचारात घेत नाही. नटूनथटून सोळा शृंगार करून स्त्रिया वडाच्या पूजेला जातात. वडाला दोरा बांधून हाच नवरा सात जन्म मिळू दे अशी हास्यास्पद मागणी मागतात. खरं तर एका जन्मातच दोघे एकमेकांना कंटाळलेले असतात त्यामुळे दोघांनाही सात जन्म तोच नवरा किंवा तीच बायको हवी असते का? मला वाटतं याचे उत्तर नाही असे असेल. एकतर पुढचा जन्म आहे की नाही हेच मुळात कोडे आहे, बरं समजा पुढचा जन्म असला तर तो मुलीचा असेल की मुलाचा असेल कोण जाणे. मग आणि एवढ्या करोडो लोकसंख्येतून वड बिचारा तुम्हाला तोच जोडीदार कुठून शोधून देणार? आणि राहिला उपवासाचा प्रश्न, तर उपवासामुळे फक्त पोटाचे आरोग्य सुधारू शकते, त्यासाठीच उपवास करावा. बाकी भाकड कथांकडे फारसे लक्ष न देता सध्याच्या सावित्रीने तरी डोळे उघडे ठेवून वटपौर्णिमेच्या दिवशी एक वडाचे झाड लावले, की पुढच्या सात पिढ्यांनाच नाहीतर कित्येक पिढ्यांना सावली व ऑक्सिजन देतील.

गेल्या वर्षीची ही गोष्ट. माझी घरकाम करणारी बाई आली आणि आल्याबरोबर तिच्या अंगावरचे माराचे व्रण पाहून मी तिला विचारलं, “काय झालं?” तर म्हणाली, “ताई माझ्या बेवड्या नवऱ्याने मारलं.” का मारलं याचं कारण तिने सांगितलं दारूला पैसे दिले नाहीत म्हणून मारलं. मग मी म्हणाले, “पोलीस स्टेशनला कंप्लेंट का नाही केली?” तर म्हणाली “रोजचंच आहे. जाऊ द्या माझं नशीबच फुटकं.” काम झाल्यानंतर घरी जाताना म्हणाली, “ताई मी उद्या येणार नाही. उद्या मला वडाची पूजा करायला जायचं आहे.”त्यावर मी म्हणाले, वडाला सात जन्म हाच नवरा मागणार आहेस का? हाच दारूडा नवरा तुला पुढच्या जन्मातही हवा आहे का? त्यावर तिला काय उत्तर द्यावे समजले नाही. मग म्हणाली, आई-आजी वडाची पूजा करत होत्या म्हणून मी पण करते. किती दिवस हे असंच चालणार? अशिक्षित स्त्रियांचं ठीक आहे पण सुशिक्षित स्त्रियादेखील वडाच्या फांद्या तोडून आणून त्याची पूजा करतात. अंधपणे पाठीमागून चालत आलंय म्हणून कोणतेही व्रत पुढे चालू ठेवतात; परंतु त्याच्या मागची कारणे समजून घेत नाहीत.वडाच्या वृक्षाचे पौराणिक महत्त्व असे आहे, भारतीय संस्कृतीत वडाच्या वृक्षाला अमरत्वाचे प्रतीक मानले जाते. वटवृक्षांमध्ये ब्रह्मदेवाचा वास असतो. खोडात विष्णूचे अस्तित्व मानले जाते. फांद्यांमध्ये महादेवाचे निवासस्थान असते असा समज आहे. वड हा भारतातील सर्वात उपयुक्त आणि दीर्घायुषी वृक्षांपैकी एक आहे. त्यामुळे मैत्रिणींनो या वटपौर्णिमेला एक वडाचे झाड नक्की लावा, त्याचे संगोपन, संवर्धन करा. काही वर्षांनी त्याचे डेरेदार वृक्षामध्ये रूपांतर होईल. त्याच्या सावलीला प्रवासी विसावतील. पक्षी खांद्यावर घरटे बांधतील. वडाचे झाड दिवसभर मोठ्या प्रमाणात प्राणवायू निर्माण करेल आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेईल आणि परिसरातील तापमान कमी करेल. जमिनीतील पाण्याचे संवर्धन होईल.म्हणूनच वड हा जैवविविधतेचा आधारस्तंभ मानला जातो. हीच खरी वटपौर्णिमेची आदर्श पूजा ठरेल. मग लावाल ना एक झाड वडाचं? मी प्रत्येक वर्षी हे व्रत घेतले आहे. माहेरी, सासरी वडाची झाडे लावली आहेत. प्रवास करताना रस्त्यामध्ये कुठे वडाच्या फांद्या तोडून टाकल्या असतील, तर त्या गोळा करून गाडीत ठेवते आणि गावी जाऊन त्या रस्त्याच्या बाजूने लावते.

वटवृक्षांची पूजा करण्यामागे पर्यावरण संवर्धनाचा दूरदृष्टीचा विचार असावा असे मला वाटते. लोकांनी श्रद्धेने वृक्षारोपण करून त्याचे श्रद्धेने पालन करावे म्हणून याला धार्मिक कहाणी जोडली असावी आणि स्त्रियाच प्रत्येक गोष्टीचे पालन अतिशय श्रद्धेने आणि आपुलकीने करतात. कुटुंबाच्या सुखासाठी समर्पण करतात म्हणून हे व्रत स्त्रियांनी करावे असे त्यामागे कारण आहे.आजच्या काळात वाढते शहरीकरण, जंगलतोड आणि हवामानात होत असलेला बदल. जमिनीची झपाट्याने होत असलेली धूप, वाढते तापमान यामुळे मनुष्य त्रस्त होत चालला आहे. सर्व सुख-सोयी बाजूला असूनही तो सुखाची अनुभूती करत नाही. सिमेंटच्या जंगलात राहताना तो निसर्गापासून दूर जात आहे. आपण जिथे राहतो तिथे आपल्या आजूबाजूला शक्य होईल तिथे वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन अत्यंत आवश्यक झाले आहे.सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन वटपौर्णिमेच्या निमित्ताने वटवृक्षाचे महत्त्व पटवून देऊन वटवृक्षाच्या रोपाचे वाटप करावे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबाने किमान एक वडाचे रोप लावावे.‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या संत तुकारामाच्या अभंगाची कायम स्मृती मनात जागृत ठेवावी तरंच आपण या निसर्गाच्या सान्निध्यात सुखी-समाधानी होऊ.वटपौर्णिमेच्या निमित्ताने स्त्रिया एकत्र येतात, परस्पर संवाद साधतात. आपली पारंपरिक संस्कृती जपतात.जाता जाता एवढेच सांगेल, की वटपौर्णिमेच्या व्रतामागे श्रद्धा, निसर्गप्रेम आणि कुटुंबसंस्कृती यांचा सुंदर संगम आहे. सावित्रीच्या निष्ठेचा आदर्श, वडाच्या वृक्षाचे पर्यावरणीय महत्त्व आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश या निमित्ताने मी आपल्यापर्यंत पोहोचले आहे. आपण वृक्षांचे रक्षण केले, तर वृक्ष आपले आणि संपूर्ण पृथ्वीचे
रक्षण करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here