Home साप्ताहिक रिलॅक्स सप्त पुरस्कारांची शिदोरी…

सप्त पुरस्कारांची शिदोरी…

0
सप्त पुरस्कारांची शिदोरी…

प्रयोगिक रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाटकांच्या मागे कुणी व्यक्ती भक्कमपणे उभी असण्याची शक्यता तशी कमी असते. स्वतःच्या इच्छा- आकांक्षा यांच्या बळावर आणि स्वतःचाच खिसा मोकळा करत बहुतेक प्रायोगिक नाटके रंगभूमीवर उभी राहतात. काही महत्त्वाचे विषय हाती घेत, काहीतरी ठोस सांगू पाहणाऱ्या या प्रयोगशील नाटकांच्या टीमला रसिकांचा प्रतिसाद अपेक्षित असतो. अनेकदा तर, या नाटकांना रसिकांची उपस्थिती कमी असली तरी हाती घेतलेले कार्य नेटाने करत राहणे, असा वसा या नाटकमंडळींनी घेतलेला दिसतो. हा सगळा प्रवास करत असताना, नाटकाच्या ओंजळीत काही पुरस्कार आले की या मंडळींचा हुरूप अर्थातच वाढतो.

याच मांदियाळीत, ‘महोगाथा’ या प्रायोगिक नाटकाची टीम सध्या अभिमानाचे क्षण अनुभवत आहे आणि यासाठी निमित्त ठरली आहे, ती ‘नटश्रेष्ठ शरद तळवलकर स्मृती करंडक २०२६’ ही स्पर्धा! अलीकडेच पार पडलेल्या या स्पर्धेत या नाटकाने एकूण ७ पुरस्कारांवर नाव कोरले आहे. ‘विजय पटवर्धन फाऊंडेशन’ या संस्थेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत ‘महोगाथा’ नाटकाने सांघिक तृतीय क्रमांक पटकावला असून, ‘अतुल परचुरे स्मृती करंडक’ प्राप्त केला आहे. या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे तृतीय पारितोषिक हृदयनाथ जाधव व सावित्री मेधातुल, दिग्दर्शनाचे तृतीय पारितोषिक मंगेश सातपुते, प्रकाशयोजनेचे द्वितीय पारितोिषक विलास हुमणे, संगीताचे तृतीय पारितोषिक विक्रम होता आणि विशेष लक्षवेधी लेखनाचे पारितोषिक सावित्री मेधातुल यांना मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर, या नाटकाच्या टीमसोबत संवाद साधला असता ही मंडळी म्हणतात, “आमच्या संपूर्ण टीमच्या कष्टाला मिळालेली ही अत्यंत मोठी पोहोचपावती आहे. आम्हाला सतत प्रोत्साहन देणाऱ्या सर्व रसिकांचे आम्ही मनापासून ऋणी आहोत. ‘महोगाथा’चा हा प्रवास इथेच थांबणार नाही; तर या पुरस्कारांच्या ऊर्जेने तो आता अधिक आत्मविश्वासाने पुढे सुरू राहील. रंगमंचावर घाम गाळणाऱ्या कलाकारांपासून ते पडद्यामागे राबणाऱ्या आमच्या तांत्रिक टीमपर्यंत प्रत्येकाच्या प्रामाणिक प्रयत्नांचे हे यश आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here