अलीकडच्या काळात स्टँड-अप कॉमेडीच्या क्षेत्रात घडणाऱ्या विविध घडामोडींमुळे एक अत्यंत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज अश्लीलता, द्विअर्थी संवाद, शारीरिक रचनेची विडंबना आणि इतरांच्या मानहानीतून निर्माण होणाऱ्या हास्यालाच विनोद मानण्याची गल्लत केली जात आहे. पण विनोद हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून ते समाजाला आरसा दाखवणारे, मानवी स्वभावातील विसंगतींवर बोट ठेवणारे आणि माणसाला अधिक संवेदनशील बनवणारे एक प्रभावी साधन आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.
प्रणित मोरेच्या कार्यक्रमातील हिमांशू नावाच्या तरुणाचा वादग्रस्त किस्सा असो किंवा डॉ. सेजल पवार यांची विधाने असोत; या घटना केवळ वैयक्तिक पातळीवरील चुका नाहीत. या घटनांकडे एका व्यापक सामाजिक-सांस्कृतिक मानसिकतेचे लक्षण म्हणून पाहण्याची गरज आहे. जेव्हा मनोरंजनाच्या नावाखाली मानवी प्रतिष्ठा, स्त्रियांचा सन्मान आणि व्यावसायिक नैतिकता वेशीवर टांगली जाते, तेव्हा समाज म्हणून आपण नेमके कुठे चाललो आहोत, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली असते.
https://prahaar.in/2026/06/14/increase-the-number-of-ac-local-trains-from-borivali-mla-upadhyay-urges-railway-minister/
महाराष्ट्राला विनोदाची आणि वैचारिक प्रबोधनाची एक अत्यंत समृद्ध आणि जाज्वल्य परंपरा लाभलेली आहे. व्यंग, उपरोध, उपहास, कोटी आणि सामाजिक भाष्य यांचा एक सुरेख संगम मराठी साहित्यात आणि रंगभूमीवर नेहमीच पाहायला मिळाला आहे. प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील यांच्यासारख्या लेखकांनी विनोदाला केवळ क्षणिक मनोरंजनाचे साधन मानले नाही, तर त्याला समाजप्रबोधनाचे आणि मानवी नातेसंबंध जोडण्याचे माध्यम बनवले.
या पारंपरिक आणि आताच्या विनोदाचा जर आपण सूक्ष्म अभ्यास केला, तर या दोन्ही कालखंडांतील केंद्रबिंदू आणि उद्देशांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक पडल्याचे दिसून येते. सादरीकरणाच्या पद्धतीमध्येही हाच मोठा फरक प्रकर्षाने जाणवतो. पुलंनी त्यांच्या साहित्यातून आणि सादरीकरणातून असंख्य अजरामर व्यक्तिरेखा निर्माण केल्या. आपण त्या पात्रांवर मनापासून हसतो, पण कधीही त्यांचा तिरस्कार करत नाही; उलट त्यांच्याबद्दल एक अनामिक आपुलकी निर्माण होते. पात्रांबद्दल आपुलकी निर्माण करून त्यांच्या विसंगतीवर हसवण्याची ही हास्यसंस्कृती होती. अत्र्यांच्या व्यंगामध्ये धार होती, पण ती समाजातील ढोंगीपणावर आणि अन्यायावर प्रहार करणारी होती. मिरासदार आणि शंकर पाटील यांच्या कथांमधील विनोद ग्रामीण जीवनातील साध्या, निष्पाप विसंगतींमधून उगम पावत असे. या सर्व महान लेखकांच्या लिखाणात माणसांना हसवले जात होते, पण संवेदनशीलतेची सीमा ओलांडून कोणाचा तरी अपमान करणे, हा या परंपरेचा भाग कधीच नव्हता; परंतु आजची पद्धत पूर्णपणे बदलली असून समोर बसलेल्या प्रेक्षकांचा सार्वजनिक मंचावर तमाशा करणे, त्यांना हीन लेखणे आणि त्यांच्या अपमानातून हास्य निर्माण करणे हाच मोठा उद्योग झाला आहे. याचे दूरगामी परिणामही तितकेच घातक आहेत.
https://prahaar.in/2026/06/14/shahid-kriti-and-rashmika-jostled-by-fans-in-pune-major-chaos-at-phoenix-mall-event/
आजच्या स्टँड-अप कॉमेडीच्या जगात “क्राउड वर्क” हा प्रकार कमालीचा लोकप्रिय ठरत आहे. मंचावरील कलाकाराने समोर बसलेल्या प्रेक्षकांशी थेट संवाद साधून, त्यांच्या उत्तरांमधून उत्स्फूर्तपणे विनोद निर्माण करणे म्हणजे क्राउड वर्क. ही खरोखरच एक उत्तम कला आहे, ज्यासाठी कमालीची निरीक्षणशक्ती, चातुर्य, हजरजबाबीपणा आणि प्रसंगावधान आवश्यक असते; मात्र, आजकाल अनेक ठिकाणी या कलेचे रूपांतर एका विकृत प्रकारात होताना दिसत आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये क्राउड वर्क म्हणजे प्रेक्षकांच्या वैयक्तिक, खासगी आयुष्याचा सार्वजनिक तमाशा बनवणे असाच प्रकार सुरू आहे. प्रेक्षकाने विश्वासाने सांगितलेल्या एखाद्या खासगी अनुभवाचा वापर करून, केवळ टाळ्या आणि शिट्ट्या मिळवण्यासाठी त्याला अधिकाधिक अश्लील, सनसनाटी आणि भडक स्वरूप दिले जाते.
प्रणित मोरेच्या कार्यक्रमात हिमांशू या तरुणाच्या “बिर्याणी” विनोदाने हाच बेशरमपणा चव्हाट्यावर आणला आहे. या सादरीकरणात केवळ अश्लील भाषेचा अतिरेक नव्हता, तर त्यात विकृत अभिमान दडला होता. एका स्त्रीसोबतच्या अत्यंत खासगी आणि वैयक्तिक अनुभवाचे ज्या हिणकस पद्धतीने सार्वजनिक प्रदर्शन करण्यात आले, ते अस्वस्थ करणारे आहे. या संपूर्ण प्रकारातून स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून सन्मान देण्याऐवजी, केवळ पुरुषी अहंकाराच्या प्रदर्शनासाठी वापरली जाणारी वस्तू म्हणून पाहण्याची पूर्वग्रहदूषित मानसिकता स्पष्टपणे दिसून येते. याहूनही गंभीर बाब म्हणजे, समोर बसलेले शेकडो प्रेक्षक या विकृत विनोदावर खदाखदा हसत होते, टाळ्या वाजवत होते आणि स्वतः कलाकार त्याला प्रोत्साहन देत होता. समस्या केवळ हिमांशू नावाच्या एका तरुणाच्या वक्तव्यात नाही; समस्या त्या सामूहिक मानसिकतेत आहे जी अशा विकृतीला विनोद समजून त्याचे कौतुक करते.
https://prahaar.in/2026/06/14/mumbai-ahmedabad-bullet-train-when-will-indias-first-bullet-train-run-railway-minister-gives-a-major-update/
याच सामाजिक मानसिकतेचे दुसरे टोक म्हणजे डॉ. सेजल पवार हिच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेताना वापरल्या जाणाऱ्या मृतदेहांबद्दल अत्यंत उथळ आणि असंवेदनशील भाषेत टिप्पणी केल्यामुळे समाजमनातून तीव्र संताप व्यक्त झाला. हा संताप पूर्णपणे स्वाभाविक आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय समाजावर फार मोठे उपकार करत असतात. आपल्या मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा उपयोग भविष्यातील डॉक्टर घडवण्यासाठी व्हावा, हा त्यामागील उदात्त हेतू असतो. तो मृतदेह वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा विषय असला, तरी ते शरीर मानवी सन्मानापासून मुक्त होत नाही. अशा देहांची टिंगलटवाळी करणे किंवा त्यांच्या अवयवांवर विनोद करणे हे अत्यंत वेदनादायी आहे. समाजाचा डॉक्टरवर एका देवासारखा विश्वास असतो. डॉक्टरकडून केवळ तांत्रिक ज्ञानाची किंवा कौशल्याची अपेक्षा नसते; तर माणसाविषयीची करुणा, आदर आणि सर्वोच्च संवेदनशीलतेची अपेक्षा असते. जेव्हा सोशल मीडियावर केवळ ‘इन्फ्लुएन्सर’ म्हणून प्रसिद्धी मिळवण्यासाठी, लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी या विश्वासाचा आणि संवेदनशीलतेचा बळी दिला जातो, तेव्हा डॉक्टर-रुग्ण या पवित्र नात्यालाच तडा जातो.
अर्थात, या प्रकरणावर टीका करताना काही नेटकऱ्यांनी संबंधित व्यक्तीच्या जातीवर, आरक्षण प्रक्रियेवर किंवा वैयक्तिक आयुष्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाष्य केले, तेही तितकेच निषेधार्ह आहे. टीका ही नेहमी विचारांवर आणि वर्तनावर असावी, व्यक्तीच्या जन्माधिष्ठित ओळखीवर किंवा जातीवर नव्हे; परंतु या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की, आजच्या डिजिटल युगात लोकप्रियता मिळवण्यासाठी कोणतीही सीमा ओलांडण्याची एक जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे.
https://prahaar.in/2026/06/14/horrific-accident-on-the-bhandara-sakoli-highway-speeding-unidentified-vehicle-hits-two-killed-on-the-spot/
केवळ शारीरिक ठेवणीवरून किंवा अवयवांवरून थट्टा करणे किंवा खासगी बेडरूममधील अनुभवांचे भडक वर्णन करणे याला विनोद म्हणता येत नाही. तो केवळ प्रेक्षकांच्या सुप्त भावनांना उत्तेजित करण्याचा एक स्वस्त प्रयत्न असतो. आजचे अनेक तथाकथित विनोदवीर साहित्याचा, संस्कृतीचा आणि भाषेचा कोणताही गाढा अभ्यास नसल्यामुळे थेट मानवी शरीराकडे आणि लैंगिक अश्लीलतेकडे धाव घेतात, कारण तो विनोदनिर्मितीचा सर्वात सोपा मार्ग वाटतो. या संपूर्ण सांस्कृतिक अधःपतनामागे एक अत्यंत महत्त्वाचे कारण दडलेले आहे, ते म्हणजे आपली हरवलेली वाचनसंस्कृती. ज्या पिढीने पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, द. मा. मिरासदार यांचे साहित्य कधी वाचलेच नाही, त्या पिढीला भाषेतील चमत्कृती, सूक्ष्म उपरोध आणि शाब्दिक कोटी यांमधील सौंदर्य कधी समजणारच नाही. आजचे मनोरंजन हे केवळ ३० सेकंदांच्या किंवा १ मिनिटाच्या रील्स आणि शॉर्ट्समध्ये मावले आहे. माणसाकडे विचार करण्यासाठी वेळ नाही, संदर्भ समजून घेण्याची सवय उरलेली नाही.
यामुळे थेट भडक आणि शरीरकेंद्री विनोद लगेच लोकप्रिय होतात. ज्या समाजात वाचन कमी होते, तिथे भाषेची समृद्धी आणि खोली नष्ट होते. भाषेची समृद्धी संपली की आपोआपच विनोदाचा स्तर खालावत जातो. या संपूर्ण प्रक्रियेत आपण केवळ कलाकारांना दोष देऊन चालणार नाही. यामध्ये प्रेक्षकांची जबाबदारी तितकीच, किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाची आहे. प्रणित मोरे, हिमांशू किंवा सेजल पवार यांच्याभोवती निर्माण झालेले वाद हे बौद्धिक दिवाळखोरीचे जिवंत पुरावे आहेत. विनोद आणि विकृती यांमधील सीमारेषा आता पूर्णपणे धूसर झाली आहे. लोकप्रियतेच्या आणि पैशाच्या हव्यासापोटी काहीही बोलण्याची वृत्ती बळावत चालली आहे. विनोद हा माणसाला अधिक माणूस बनवणारा, त्याचे दुःख हलके करणारा आणि त्याला स्वतःच्या चुकांवर हसायला शिकवणारा असायला हवा. तो कोणाचा तरी सार्वजनिक अपमान करून, स्त्रीचा सन्मान धुळीस मिळवून किंवा मृतदेहांची थट्टा करून निर्माण होऊ शकत नाही.
__प्रासंगिक विवेक जाधव