दोडामार्ग: प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याचा शेवट एका धक्कादायक हत्याकांडात (Murder) झाला आहे. कर्नाटकातील धारवाड-हुबळी परिसरातील गंगव्वा सत्त्याप्पा हंचीमणी हिच्या खूनप्रकरणाचा उलगडा झाला असून, तिचा प्रियकर असलेल्या शिक्षकानेच लग्नाच्या आड येत असल्याच्या रागातून तिची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. (Crime News)
मुख्य आरोपी बसवराज यल्लाप्पा करण्णावर (वय 33) हा हुबळी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याचे आणि गंगव्वाचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र बसवराजच्या कुटुंबीयांनी त्याचे लग्न ठरविण्याचे प्रयत्न सुरू केल्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला. गंगव्वा या विवाहाला विरोध करत असल्याने आणि वैवाहिक आयुष्यात अडथळा ठरत असल्याची भावना निर्माण झाल्याने बसवराजने टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात समोर आले आहे.
नातेवाईकांच्या मदतीने रचला कट
पोलिसांच्या माहितीनुसार, बसवराजने आपल्या वडिलांची आणि मामाची मदत घेऊन कट रचला. गंगव्वाला विश्वासात घेऊन प्रथम बेळगावला आणण्यात आले. त्यानंतर क्रुझर वाहनातून तिलारी घाट परिसरात नेऊन तिची हत्या करण्यात आली. खून केल्यानंतर मृतदेह तिलारी घाटातील प्रेशर पॉईंटजवळ फेकून देण्यात आल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
या प्रकरणात बसवराजसह त्याचे वडील यल्लाप्पा मल्लाप्पा करण्णावर (57) आणि मामा लगमाप्पा अंकलगी (37) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, खून करून परतत असताना आरोपींच्या क्रुझर वाहनाला अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेल्या वाहनचालकावर उपचार सुरू असून त्याची चौकशी अद्याप होऊ शकलेली नाही. त्याच्याकडून या कटाबाबत आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
प्रेमसंबंध, लग्नाचा तणाव आणि त्यातून निर्माण झालेली सूडाची भावना यामुळे एका तरुणीचा बळी गेल्याने या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. प्रेमातून निर्माण होणाऱ्या हिंसक प्रवृत्तीबाबतही या घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.