महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील
१७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सत्ताधारी महायुतीने संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील संख्याबळाच्या जोरावर आघाडी घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे विदर्भातील बहुतांश मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार सरस ठरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या १७ उमेदवारांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यात विदर्भातील पाच जागा आहेत. या पाच जागांमध्ये नागपूर मतदारसंघ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघ, अमरावती मतदारसंघ, यवतमाळ मतदारसंघ, आणि भंडारा, गोंदिया मतदारसंघ अशा पाच मतदारसंघांतून आमदार निवडायचे आहेत.
https://prahaar.in/2026/06/13/pune-it-engineer-suicide-shocking-incident-in-hinjawadi-it-engineer-ends-life-after-being-driven-to-despair-by-mental-harassment-at-tcs/
या पाच जागांपैकी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या दोन मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या दिवशी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आणि इतर उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे दोन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात यवतमाळमध्ये शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी हे दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत, तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघातून भाजपचे अरुण लखानी हे बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे आता नागपूर, भंडारा, गोंदिया आणि अमरावती या तीन मतदारसंघांमध्ये लढत होत असून १८ जून रोजी मतदान होऊन इथल्या उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद होणार आहे. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये अरुण लखानी हे उद्योगपती असून संघ परिवाराशी संबंधित आहेत. त्याचप्रमाणे नितीन गडकरी यांचे निकटवर्ती आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती ही लवकरच अरुण लखानी यांची सून होणार आहे. दुष्यंत चतुर्वेदी हे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे सुपुत्र असून ते मात्र राजकारणात आल्यापासून शिवसेनेतच राहिलेले आहेत. त्यांची निवडून येण्याची ही दुसरी टर्म आहे.
https://prahaar.in/2026/06/13/diesel-sale-restriction-government-cracks-down-on-diesel-hoarding-limit-of-200-liters-of-diesel-per-vehicle-per-day-new-rules-in-effect/
यातील निवडणुकांमध्ये सध्या अमरावती मतदारसंघातील निवडणूक चांगलीच गाजते आहे. ती गाजण्याचे कारण म्हणजे काँग्रेसमधील अंतर्गत दुफळी हेच म्हणता येईल. मात्र झाल्या प्रकारात आता भाजपवर आरोप करणे सुरू झाले आहे. इथे भाजपचे विद्यमान आमदार प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे हर्षदीप देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. हर्षदीप देशमुख हे मुळात नागपूरचे आहेत. त्यामुळे अमरावतीच्या काँग्रेसजनांचा विरोध आहे. त्यातच तीन दिवसांपूर्वी देशमुख यांची अचानक प्रकृती बिघडली आणि त्यांना नागपूरच्या खासगी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले आहे. त्यावरून आता मोठे वादंग उठले आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी हर्षदीप देशमुख यांच्यावर भाजपकडून २० कोटी रुपये घेऊन ‘मॅनेज’ झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. नागपूरमधील रुग्णालयातून माध्यमांशी संवाद साधलेल्या हर्षदीप देशमुख यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रकृती इतकी गंभीर असताना माध्यमांना प्रतिक्रिया कशी देता आली, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुनील देशमुख यांनीही हर्षदीप देशमुख यांच्या रुग्णालयात दाखल होण्याबाबत नाराजी व्यक्त करत, हॉस्पिटलमधून बोलण्याऐवजी मैदानात उतरून लढावे, असे आव्हान दिले आहे. या घडामोडींमुळे स्थानिक काँग्रेस नेते हर्षदीप देशमुख यांना पाठिंबा देण्याबाबत साशंक असल्याचे सांगितले जात असून, काही नेते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नीलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे.
https://prahaar.in/2026/06/13/bhandup-news-dispute-involving-street-vendors-escalates-in-bhandup-senior-citizen-allegedly-assaulted-police-take-action/
तसेही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचेच वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फीच होईल असे बोलले जात आहे. प्रवीण पोटे हे यापूर्वीही दोनदा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातूनच विधान परिषदेवर सदस्य म्हणून गेलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात काही काळाचे मंत्री देखील राहिलेले आहेत. त्यांच्या आधी भाजपचे जगदीश गुप्ता हे देखील या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यामुळे त्यांचा या भागात संपर्क दांडगा आहे. नागपूर मतदारसंघात यावेळी महायुतीतर्फे भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजीव पोतदार हे या भागातील भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. नागपूर जिल्हा भाजपचे हे काही काळ अध्यक्षही राहिलेले आहेत. त्यांच्या आधी या मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, त्याआधी भाजपचेच गिरीश व्यास हे विजयी झाले होते. सध्या नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद लक्षणीय अशीच राहिलेली आहे. अशातच काँग्रेस पक्ष हा नागपूर जिल्ह्यात अतिशय विस्कळीत अवस्थेत आहे. जरी नागपूर ग्रामीणमध्ये रामटेक लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचे नरेश बर्वे हे खासदार असले तरी विधानसभा क्षेत्रात त्यांची फारशी ताकद राहिलेली नाही. उमरेडमध्ये काँग्रेसचे संजय मेश्राम वगळता बाकी इतर सर्व आमदार महायुतीचे आहेत. शिवाय नागपूर जिल्ह्यात भाजपचे देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे असे तीन दिग्गज नेते सक्रिय आहेत. त्यामुळे पोतदारांची जागा निश्चित निघेल असे बोलले जात आहे. काँग्रेसतर्फे त्यांच्या विरोधात अतुल लोंढे उभे आहेत. अतुल लोंढे हे विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि त्या आधीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निकटवर्ती राहिलेले आहेत.
https://prahaar.in/2026/06/13/provide-an-account-of-the-financial-assistance-given-to-best/
त्यामुळेच त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होते त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेते आणि लोंढे यांचे फारसे सख्य नाही. त्या तुलनेत डॉ. पोद्दार हे कायम जिल्ह्यातच असतात. त्यामुळे पोतदारांचा विजय निश्चित मानला जात आहे. नागपूर जिल्हा हा एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. १९७७ मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झाले. शंकरराव चव्हाण यांचे मंत्रिमंडळ जाऊन वसंतदादा पाटील यांचे मंत्रिमंडळ आले. त्यावेळी पुसदचे सुधाकरराव नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. मात्र ते कुठलेही आमदार नव्हते. त्यामुळे त्यांना नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यानंतरही दीर्घकाळ हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहिला होता. २००३ मध्ये नितीन गडकरींनी आपली चाणक्यनीती वापरून हा मतदारसंघ भाजपकडे खेचला. भंडारा, गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे रिंगणात उतरले आहेत. इथे देखील महाविकास आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतलेली असल्यामुळे ही निवडणूक एकतर्फीच होईल असे बोलले जात आहे. काँग्रेसच्या काळात देखील इथून भाजपचे लक्ष्मणराव मानकर, महादेव शिवणकर, हेमकृष्ण कापगते अशी सर्व मंडळी निवडून येत होती. मात्र मधल्या काळात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे नाना पटोले यांनी या भागात आपले वर्चस्व वाढवले होते. अर्थात यावेळी प्रफुल्ल पटेल हे महायुती सोबतच आहेत. त्यामुळेच की काय २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत इथे काँग्रेसचे एकटे नाना पटोले वगळता मविआचे कोणीही निवडून आले नव्हते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून यापूर्वी भाजपचेच परिणय फुके हे निवडून येत होते. आता यावेळी अविनाश ब्राह्मणकर यांना संधी मिळाली आहे. इथे देखील महाविकास आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतली असल्यामुळे नरेश ईश्वरकर आणि सचिन कुंभलकर या दोन अपक्षाशी त्यांची लढत होणार आहे.
विदर्भातील चित्र पाहता चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळ या दोन्ही मतदारसंघात महायुतीने आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणून आपले खाते उघडले आहे. आता उर्वरित तीन जागी देखील महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असे चित्र दिसत आहे. अर्थात मतदार फोडले जाणे, त्यांनी क्रॉस्फोटिंग करणे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे बहुतेक सर्व ठिकाणी आधीच सर्वच पक्षांनी आपापल्या मतदारांना वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनासाठी नेऊन ठेवलेले आहे. या सर्वांना १८ जूनलाच परत आणले जाईल आणि त्यानंतर मतदान होऊन सर्वांचे भाग्य पेटीबंद केले जाईल. अर्थात त्याचा निकाल यायला आपल्याला २२ जूनपर्यंत थांबावे लागणार आहे.