पुणे : एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत देशभरातील विद्यार्थ्यांची आणि पालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या तेलंगणातील (Telangana) एका महाठगाला पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. आदित्यकुमार उर्फ अरविंद प्रकाशकुमार आरोगोंडा (वय ४७) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात यापूर्वी मुंबई आणि हैदराबाद येथे फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका पालकाची ८.२५ लाख रुपयांची फसवणूक झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. येरवडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान आरोपीने पुणे, मुंबईसह विविध शहरांतील पालकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या साथीदाराच्या मदतीने हैदराबाद येथे ‘एडव्हिओ लर्निंग सोल्यूशन्स प्रा. लि.’ नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून पुणे आणि मुंबईमध्ये ‘प्रवेश मार्गदर्शन केंद्र’ सुरू करण्यात आले होते. ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांशी संपर्क साधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी ५ लाख रुपये, तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ३ लाख रुपये ‘समुपदेशन फी’ म्हणून आकारली जात होती.
प्रवेशाची खात्री देत मोठ्या रकमा उकळल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचे लक्षात येताच अनेक पालकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवून या रॅकेटचा पर्दाफाश केला.
दरम्यान, आरोपी अरविंद आरोगोंडा याला काही दिवसांपूर्वी मुंबईतील पवई पोलिसांनी अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. पुढील तपासासाठी पुण्याच्या येरवडा पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणामुळे वैद्यकीय शिक्षणातील प्रवेश प्रक्रियेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीच्या जाळ्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, अशा बनावट एजन्सींपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी विद्यार्थी आणि पालकांना केले आहे.