– पक्ष हितासाठी कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही
मुंबई : “राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी अत्यंत वेगळ्या आणि आव्हानात्मक परिस्थितीत पक्षाची जबाबदारी स्वीकारली आहे. मला येणाऱ्या सर्व राजकीय परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. दादांप्रमाणे कठोर निर्णय घेणे हा जरी माझा मूळ स्वभाव नसला, तरी पक्षाच्या हितासाठी मी तसे धाडसी निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. पक्षात कुणाचाही अनधिकृत हस्तक्षेप मी खपवून घेणार नाही,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी गुरुवारी दिला.
उपस्थितांना संबोधित करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि राज्याच्या विकासासाठी रक्ताचे पाणी करणारे अजितदादा आज आपल्यात नाहीत. त्यांच्याशिवाय साजरा होणारा हा पक्षाचा पहिलाच वर्धापनदिन आहे. राज्याला देशाच्या सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी त्यांनी घेतलेले कठोर परिश्रम आपण सर्वांनी पाहिले आहेत. दादांची कामाची पद्धत आणि त्यांचे विचार आपल्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरतील. त्यांची जागा या पक्षात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कुणीच घेऊ शकत नाही,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. (Sunetra Pawar)
https://prahaar.in/2026/06/11/member-of-parliament-dr-shrikant-shinde-transport-minister-takes-immediate-note-of-mp-dr-shrikant-shindes-request/
तसेच प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा ‘ऑक्सिजन’ असून, बूथ पातळीवरील प्रत्येक सहकाऱ्याचा सन्मान केला जाईल आणि गाव, वाडी, वस्ती पातळीवर कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Sunetra Pawar)
राजकारणाचा खेळ करू नका – छगन भुजबळ
तटकरे आणि भुजबळ यांच्यात शाब्दिक जुगलबंदी :
– कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यातील शाब्दिक जुगलबंदीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तटकरे यांनी आपल्या भाषणात भुजबळांची तुलना ‘कबड्डीपटू’शी केली होती. त्याला उत्तर देताना भुजबळ म्हणाले, “खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ करू नका; पक्षापेक्षा कोणीही मोठे नाही.”
– त्यावर तटकरे म्हणाले, “भुजबळ साहेब हे राजकारणातील उत्कृष्ट कोपरारक्षक (कबड्डीपटू) आहेत. खोलवर चढाई कशी करायची हे त्यांच्याइतके कुणालाच ठाऊक नाही. ते कधी बोनस गुण घेऊन येतील तर कधी एकाच वेळी समोरच्यांचे सातही जण बाद करून येतील. हा ८० वर्षांचा तरुण आता वहिनींचे हात बळकट करण्यासाठी मैदानात उतरला आहे. त्यांच्या सोबतीला फुटबॉलपटू प्रफुल्ल पटेल आणि कुस्तीपटू हसन मुश्रीफ अशी तगडी टीम आहे,” अशी कोपरखळी तटकरें काढली.
https://prahaar.in/2026/06/11/resignation-drama-continues-in-trinamool-congress-rajya-sabha-mp-prakash-chik-baraik-resigns/
भाजपच्या पाठिंबा पत्रावर पहिली सही कुणाची?
सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांकडून होणाऱ्या ‘गद्दारी’च्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. २०१९ मधील भाजपसोबतच्या सत्तास्थापनेच्या पडद्याआड घडलेल्या घडामोडींवर त्यांनी भाष्य केले. “आज आमच्यावर महायुतीवरून आणि भाजपसोबत गेल्यावरून जे तोंडसुख घेत आहेत, त्यांनी आधी इतिहास तपासावा. २०१९ मध्ये अजितदादांच्या शासकीय कार्यालयात पक्षाचे सर्व आमदार एकत्र बसले होते. ‘आपण भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले पाहिजे’, असे स्पष्ट लिहिलेले पत्र सर्व आमदारांच्या सह्यांसह शरद पवार साहेबांना पाठवण्यात आले होते. आमच्यावर टीका करणाऱ्या रोहित पवारांनी सांगावे, की त्या पत्रावर सर्वात पहिली सही कुणाची होती? तो कागद आता शोधून काढण्याची वेळ आली आहे,” असे आव्हान तटकरे यांनी दिले. तसेच २००४ मध्ये जर राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिले नसते, तर आज राज्याचे राजकारण वेगळे असते, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
शहरी भागावर लक्ष केंद्रित करा – प्रफुल्ल पटेल
– राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले, “येणाऱ्या काळात देशात मतदारसंघांची पुनर्रचना (डीलिमिटेशन) होऊ शकते. त्यानंतर महिला आरक्षण विधेयक पूर्ण बहुमताने मंजूर होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि राज्यसभेत एनडीएकडे बहुमत असले, तरी त्यासाठी दोन तृतीयांश खासदारांची गरज असते. बदलत्या परिस्थितीत हे बिल नक्की मंजूर होईल,” असा दावा त्यांनी केला.
– पुढे बोलताना पटेल यांनी पक्षाच्या विस्तारावर भर दिला. “आजवर आपण केवळ ग्रामीण भागाचा विचार केला, कारण आपली ओळख शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून आहे. पण आता झपाट्याने शहरीकरण होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे या शहरांचे राजकीय वजन आता ग्रामीण भागापेक्षा जास्त असणार आहे. सध्या मुंबईत सना मलिक वगळता आपला एकही आमदार नाही. त्यामुळे शहरी भागात लक्ष केंद्रित केल्याशिवाय पक्षाला पर्याय नाही,” असे ते म्हणाले.