मंत्री छगन भुजबळ; ‘पक्षात मी नाराज नाही, इतरांना न्याय मिळाला तसा मलाही मिळावा’
मुंबई : “राज्यसभेच्या उमेदवारीवरून मी नाराज नाही. मला लोकसभा किंवा राज्यसभेत जाण्याच्या यापूर्वी ४-५ वेळा संधी आल्या, पण दुर्दैवाने त्या हुकल्या. पक्षात इतरांच्या कुटुंबातील सदस्यांना जसा न्याय मिळाला, तसाच तो मलाही मिळावा, हीच माझी भूमिका होती. ‘मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का नहीं!’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) (NCP) ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्या नाराजीच्या चर्चांवर पडदा टाकला.
पुतणे समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रिपद देण्याची अट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फेटाळल्यामुळे भुजबळ कमालीचे नाराज झाले असून त्यांनी राज्यसभेची उमेदवारी नाकारली, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या नाट्यमय घडामोडींनंतर पक्षाने माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळ यांच्या ‘सातपुडा’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेते राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानभवनात पोहोचले. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भुजबळांनी आपली सविस्तर भूमिका मांडली.
https://prahaar.in/2026/06/08/indvsafg-day-3/
भुजबळ म्हणाले, “मकरंद पाटील राज्यात मंत्री आहेत आणि त्यांचे भाऊ राजसभेत खासदार आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत, तर त्यांचे पुत्र पार्थ पवार राज्यसभेत आहेत. सुनील तटकरे यांच्याही कुटुंबात पदे आहेत. त्यामुळे हाच नियम मला लागू करून माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा आणि मला राज्यसभेत पाठवावे, असे मी म्हटले होते. हा पक्ष स्थापन करण्यात माझाही पुढाकार आहे. त्यामुळे इतरांची मुलंबाळं जशी मंत्री, आमदार, खासदार आहेत, तसाच न्याय मला आणि माझ्या मुलांना मिळावा, ही मागणी गैर नाही,” असे भुजबळ म्हणाले.
भाजपने (BJP) समीर भुजबळ यांच्या मंत्रिपदाचा प्रस्ताव फेटाळल्याच्या वृत्ताचा भुजबळांनी इन्कार केला. “आमचा हा प्रस्ताव दिल्लीत भाजप श्रेष्ठींकडे पोहोचायला वेळ लागला असावा. कारण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा एकच दिवस शिल्लक होता. त्यामुळे भाजपकडून ‘जेव्हा राज्यात मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल होईल, तेव्हा यावर विचार करू’ असे सकारात्मक उत्तर आले. त्यामुळे भाजपने नकार दिला, या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नाही,” असा खुलासा त्यांनी केला. “आज नाही तर उद्या मला नक्कीच न्याय मिळेल,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी ‘मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का नहीं!’, असा टोलाही पक्ष नेतृत्त्वाला लगावला.