इस्रायलच्या सैन्याने दक्षिण लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या सुमारे १५० ठिकाणांवर भीषण हवाई हल्ले केले आहेत. मध्यस्थीच्या चर्चांना वेग आला असतानाही इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू माघार घेण्याच्या भूमिकेत नसल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंमध्ये अटींसह युद्धविरामावर सहमती झाल्याच्या काही दिवसांतच दक्षिण लेबनानमध्ये झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये किमान १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लेबनानी सैन्याचे वरिष्ठ अधिकारीही आहेत. (Israel – Hezbollah War)
https://prahaar.in/2026/06/07/statue-of-chhatrapati-shivaji-maharaj-to-be-erected-in-israel/
लेबनानचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना तो लेबनानच्या सार्वभौमत्वाचे तसेच आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. तसेच, लेबनानचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनीही या कारवाईचा निषेध नोंदवला आहे. एका निवेदनात पंतप्रधान नवाफ सलाम यांनी ब्रिगेडियर जनरल वस्साम सबरा, कॅप्टन एली खौरी आणि सैनिक हुसेन गोजल यांच्या कुटुंबीयांप्रती तसेच लेबनानी सैन्याप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. (Israel – Hezbollah War)
यापूर्वीही इस्रायलच्या हवाई दलाने लेबनानमधील पूर्वेकडील बेका खोरे आणि हिजबुल्लाहशी संबंधित इतर ठिकाणांवर हल्ले केले होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनानमधील दहशतवादी गटांवरील कारवाया आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. (Israel – Hezbollah War)
https://prahaar.in/2026/06/07/iran-america-war-pakistans-interior-minister-arrives-in-tehran-with-special-message-amid-us-iran-talks/
नेतन्याहू यांची ही भूमिका अशा वेळी समोर आली होती, जेव्हा हिजबुल्लाहने अलीकडच्या आठवड्यांत दक्षिण लेबनान आणि उत्तर इस्रायलमधील इस्रायली सैन्याच्या ठिकाणांवर फायबर-ऑप्टिक तंत्रज्ञानयुक्त ड्रोनच्या साहाय्याने हल्ले केल्याचा दावा करण्यात आला होता. (Israel – Hezbollah War)