Home महाराष्ट्र नाशिक Nashik Crime : वकिलावरील प्राणघातक हल्ल्यातील मुख्य सूत्रधार वर्षभरानंतर गजाआड

Nashik Crime : वकिलावरील प्राणघातक हल्ल्यातील मुख्य सूत्रधार वर्षभरानंतर गजाआड

0
Nashik Crime : वकिलावरील प्राणघातक हल्ल्यातील मुख्य सूत्रधार वर्षभरानंतर गजाआड
Kalyan Crime

Nashik Crime : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारांविरुद्ध कडक मोहीम उघडण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, वर्षभरापूर्वी एका वकिलावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या मुख्य संशयिताला अटक करण्यात आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला (डीबी) मोठे यश आले आहे. आदित्य विजय काहांडळ (रा. शिलापूर ओढा, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. तो गेल्या एका वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता.

शिलापूर ओढा येथील रहिवासी असलेले वकील रामेश्वर विठ्ठल बोराडे (वय ३९) यांच्यावर ३ जुलै २०२५ रोजी काही अनोळखी इसमांनी जमिनीच्या वादातून त्यांच्या कार्यालयात घुसून धारदार शस्त्राने डोक्यावर वार केले होते. या हल्ल्यात वकील बोराडे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ३३३, ३५१(३), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील इतर आरोपी निष्पन्न झाले असले, तरी मुख्य सूत्रधार आदित्य काहांडळ हा घटनेनंतरपासून फरार होता.

https://prahaar.in/2026/06/04/ind-vs-afg-big-blow-to-team-india-virat-kohli-out-of-odi-series-rohit-sharmas-fitness-also-in-question/

फरार संशयित आदित्य काहांडळ हा पोलिसांना चकवा देत वेगवेगळ्या ठिकाणी आश्रय घेत होता. दरम्यान, तो रात्रीच्या सुमारास शिलापूर येथील आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी घरी येणार असल्याची अत्यंत गोपनीय माहिती आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार दादासाहेब वाघ व पोलीस अंमलदार सुमित शिंदे यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी माहितीची खातरजमा करून तात्काळ आरोपीला ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, अंमलदार शक्ती पेंढारकर व सुमित शिंदे यांनी शिलापूर परिसरात रात्रीच्या सुमारास दबा धरून सापळा रचला. संशयित आदित्य परिसरात येताच पोलिसांनी त्याला घेराव घालून शिताफीने ताब्यात घेतले. वर्षभरापासून गुंगारा देणारा मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे, सहायक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, उपनिरीक्षक विकास पंचमुख, किशोर कुवर तसेच गुन्हे शोध पथकातील दादासाहेब वाघ, इम्रान शेख, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, मनोज परदेशी, श्रीकांत महाजन, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, अक्षय गोसावी, रविंद्र लिलके, प्रितम बोराटे, दिपक भुजबळ, कुणाल राऊत आणि महिला पोलीस हवालदार वैशाली बच्छाव यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक निखिल बोंडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here