Home देश Cockroach Janta Party : सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी ‘कॉकरोच जनता पार्टी’ खऱ्या राजकारणात उतरणार? संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं!

Cockroach Janta Party : सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी ‘कॉकरोच जनता पार्टी’ खऱ्या राजकारणात उतरणार? संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं!

0
Cockroach Janta Party : सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी ‘कॉकरोच जनता पार्टी’ खऱ्या राजकारणात उतरणार? संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं!
Cockroach Janta Party

सध्या इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या दुनियेत एका अत्यंत अनोख्या नावाची तुफान चर्चा रंगली आहे, ते नाव म्हणजे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party). अवघ्या सहा दिवसांच्या आत या सोशल मीडिया पेजने इन्स्टाग्रामवर तब्बल १ कोटी (10 Million) फॉलोअर्सचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) या तरुणाच्या कल्पनेतून साकारलेल्या या पक्षाने अल्पावधीतच भारतीय जनता पार्टीसारख्या (BJP) बलाढ्य पक्षाला फॉलोअर्सच्या शर्यतीत मागे टाकले आहे, तर लवकरच ते काँग्रेसलाही ओलांडतील अशी शक्यता आहे. या अनपेक्षित आणि अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता ही केवळ एक सोशल मीडिया मोहीम राहिली नसून, ती प्रत्यक्ष राजकीय चळवळीत रूपांतरित होणार का? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

‘कॉकरोच’ जनता पार्टी’ नेमका विषय काय आहे ?

एखाद्या पक्षाचे नाव ‘कॉकरोच’ (झुरळ) का असू शकते? यामागचे कारण अतिशय गंभीर आणि व्यवस्थेवरील संतापाशी जोडलेले आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी एका प्रसंगी सिस्टीमविरोधात बोलणाऱ्यांना आणि टीकाकारांना उद्देशून ‘कॉकरोच’ किंवा ‘पॅरासाईट’ (परजीवी) असे संबोधले होते. या विधानाचा अभिजीत दीपके यांना प्रचंड धक्का बसला. लोकशाहीमध्ये नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आणि बोलण्याच्या अधिकाराचे रक्षण करणे ज्यांचे आद्य कर्तव्य आहे, त्यांच्याकडून अशी टिप्पणी येणे निराशाजनक होते. याच विधानाचा उपहासात्मक आणि तीव्र निषेध करण्यासाठी अभिजीतने ‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना केली आणि व्यवस्थेवर नाराज असलेल्या लाखो तरुणांनी याला एका रात्रीत डोक्यावर घेतले.

आगामी राजकीय वाटचाल आणि निवडणुकांबद्दलचा ‘प्लॅन’ ?

एका साध्या सोशल मीडिया मोहिमेला मिळालेला १ कोटी १० लाख लोकांचा प्रचंड मोठा पाठिंबा पाहून हा पक्ष आता खऱ्याखुऱ्या राजकीय आखाड्यात आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? या प्रश्नावर अभिजीत दीपके यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, या पक्षाची स्थापना कोणत्याही पूर्व नियोजनाने किंवा राजकीय हेतूने केली नव्हती; ती केवळ सरन्यायाधीशांच्या वक्तव्यावर आलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. भविष्यात या चळवळीचे राजकीय पक्षात रूपांतर नक्की होऊ शकते, परंतु सध्या कोणतीही घाई न करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. अभिजीतच्या मते, “गेल्या तीन-चार दिवसांत आमच्यासोबत कोट्यवधी लोक जोडले गेले आहेत. आज सरकार आणि व्यवस्थेबद्दल लोकांच्या मनात एवढा संताप का आहे, हे आधी आम्हाला समजून घ्यायचे आहे. इतर प्रस्थापित राजकीय पक्ष जी चूक करतात, म्हणजेच लोकांचे म्हणणे न ऐकणे, ती चूक आम्हाला करायची नाही.” सध्याच्या घडीला कोणतीही राजकीय घोषणा करण्यापेक्षा जनतेशी थेट संवाद साधणे, त्यांच्या तक्रारी, अपेक्षा आणि चिंता समजून घेणे याला ‘कॉकरोच जनता पार्टी’ प्राधान्य देणार आहे. लोकांचे सल्ले घेतल्यानंतरच पक्षाची पुढील दिशा आणि निवडणुकीतील सहभागाबाबतचे अंतिम पाऊल ठरवले जाईल, असे अभिजीतने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here