Home ताज्या घडामोडी टेक-महाइम्पॅक्ट परिषदेत पहिल्याच दिवशी १५० कोटींचे करार

टेक-महाइम्पॅक्ट परिषदेत पहिल्याच दिवशी १५० कोटींचे करार

0
टेक-महाइम्पॅक्ट परिषदेत पहिल्याच दिवशी १५० कोटींचे करार
Ashish Shelar

मुंबई : राज्याच्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देण्यासाठी ‘आयटी’ विभागाच्या वतीने बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक महाइम्पॅक्ट २०२६’ परिषदेत पहिल्याच दिवशी विविध टेक कंपन्या आणि सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) भागीदारांसोबत तब्बल १५० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. “राज्यात येणारा कोट्यवधी रुपयांचा सीएसआर निधी आता मुंबई-पुणे महानगरांपुरता मर्यादित न ठेवता, तो शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि दुर्गम भागात पोहोचवला जाईल,” अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यावेळी केली.

 

तंत्रज्ञान, नवोपक्रम, डिजिटल गव्हर्नन्स व सीएसआर या विषयांवर आधारित या परिषदेच्या उद्धाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने मंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकाराने ही परिषद आयोजित करण्यात आली असून, यापुढे दरवर्षी ‘टेक महाइम्पॅक्ट’ परिषदेचे आयोजन केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक सीएसआर निधी येत असला, तरी गेली अनेक वर्षे हा निधी प्रामुख्याने एमएमआर (मुंबई महानगर क्षेत्र) आणि पीएमआर (पुणे महानगर क्षेत्र) या दोनच भागात जास्तीत जास्त खर्च होत होता. आमचा प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्राचा समतोल विकास करण्याचा आहे. त्यामुळे या परिषदेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या कंपन्यांसोबत सीएसआर भागीदारी करून, या उपक्रमांना एका मोठ्या प्रमाणावर संपूर्ण राज्यात नेले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here