मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेम त्रिकोणातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीशी दोन तरुणांचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नवघर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून आणखी तीन आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
https://prahaar.in/2026/05/16/8-naxalites-arrested-under-operation-antim-prahaar-gadchiroli-district-finally-becomes-naxal-free/
डीसीपी राहुल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ मे रोजी भाईंदर पूर्वेतील पूजा नगर परिसरात घडली. फिर्यादी शेर्यास मिश्रा हा रात्री साडेअकराच्या सुमारास घरी असताना आरोपी आशिष राज याने त्याला घराखाली बोलावले. त्यानंतर आरोपींनी शेर्यासला जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याचे अपहरण केले.
यानंतर आरोपींनी रात्रभर मिरा-भाईंदर शहरातील विविध ठिकाणी फिरवत शेर्यास मिश्राला बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर आरोपींनी त्याच्या अंगावर सिगारेटचे चटके दिल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. आरोपींच्या मारहाणीमुळे शेर्यास गंभीर जखमी झाला होता.
या प्रकरणी नवघर पोलिसांनी अपहरण, दरोडा, मारहाण आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे. प्रेम त्रिकोणातून हा संपूर्ण प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती असून नवघर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.